शिवसेना नगरसेवक बंटी जोशी,नितीन बरडे यांचे मनपात उपोषण

0

शहर अस्वच्छ: शहरातील स्वच्छतेचा प्रश्‍न जटील झाल्यामुळे सर्वत्र कचराकोंडी

जळगाव: शहरातील स्वच्छतेचा प्रश्‍न जटील झाल्यामुळे सर्वत्र कचराकोंडी झाली आहे. प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा निषेध करण्यासाठी आणि स्वच्छतेकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक बंटी जोशी,नितीन बरडे यांनी उपोषणाचा पवित्रा घेतला असून मंगळवारपासून त्यांनी मनपात उपोषण सुरु केले आहे. दरम्यान,महापौर भारती सोनवणे, कैलास सोनवणे, उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांनी आंदोलनस्थळी भेट देवून चर्चा केली.
मनपाने शहरात साफसफाईसाठी वॉटरग्रेसला मक्ता दिला आहे.मात्र गेल्या तेरा ते चौदा दिवसांपासून मक्तेदाराने कामबंद केले आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र कचराकोंडी झाली आहे. मनपाच्या कायम कर्मचार्‍यांच्या माध्यमातून केवळ विशिष्ट प्रभागांमध्येच सफाई केली जात असल्याने नागरिकांसह शिवसेनेच्या नगरसेवकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. स्वच्छतेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पाच दिवसापूर्वी शिवसेनेचे नगरसेवक बंटी जोशी यांनी आरोग्य विभागात आत्मक्लेश आंदोलन केले होते. शहरात स्वच्छतेची जैसै-थे परिस्थिती असल्याने त्यांनी पून्हा उपोषण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बंटी जोशी आणि नितीन बरडे यांनी मनपा प्रशासकीय कार्यालयाबाहेर उपोषण सुरु केले आहे. दरम्यान, शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपूरे, सामाजिक कार्यकर्ते नितीन सपके, नितीन महाजन, यांनी आंदोलनस्थळी भेट देवून पाठिंबा दिला. महापौर भारती सोनवणे आणि कैलास सोनवणे यांचे आंदोलनस्थळी आगमन होताच आंदोलनकर्त्यांनी ‘अंदर की बात है, महापौर अपने साथ है’ अशा घोषणा दिल्या.

शहर बेवारस

जळगाव मनपात भाजपची सत्ता आहे.आमदार,खासदार भाजपचे आहेत. मात्र गेल्या दीड-दोन वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्न तुडविण्याचे काम मनपातील सत्ताधार्‍यांनी केले.तसेच कामचुकार प्रशासनाने शहराचे वाटोळे केल्याचा आरोप नगरसेवक बंटी जोशी यांनी केला. शहरात मुलभूत सुविधा नसल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. जळगाव शहराला अक्षरश: बेवारस करुन ठेवले असल्याचेही नगरसेवक जोशी म्हणाले.