शिवसेना हिरो, अन्यथा झिरो

0

अमित महाबळ (जळगाव)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर उफाळलेल्या सत्ता संघर्षात सध्या शिवसेनेचे पारडे जड आहे. सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाला शिवसेनेच्या सहकार्याविषयी सत्ता स्थापन करता आलेली नाही, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही शिवसेनेच्या मदतीशिवाय सत्ता स्थापन करणे शक्य नाही. थोडक्यात महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेशिवाय पान हलणे अशक्य झाले आहे आणि त्याचे श्रेय खरोखरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना द्यावे लागेल. आज ते अपार यशाचे धनी आहेत पण दुर्दैवाने भविष्यात फासे उलटे पडले आणि बुद्धिबळाचा अख्खा पटच जर उधळला गेला तर मात्र, अपयशाचे दायित्त्वही उद्धव ठाकरे यांना स्वीकारावे लागणार आहे. त्यांच्या आताच्या खेळीमुळे भाजपाला कामाला लावले आहेच, त्याशिवाय राजकारणाचे नवीन आयाम प्रस्थापित होण्याची शक्यताही बळावली आहे.

महाराष्ट्रात 1990 पासून शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष एकत्र नांदत होते. हिंदुत्त्वाचा समान धागा त्यांना जोडत होता. 1995 मध्ये राज्यात सत्ता स्थापन करण्याचे भाग्य दोन्ही पक्षांना लाभले. अर्थात त्यावेळी मुख्यमंत्रिपद संख्याबळाच्या आधारे शिवसेनेकडेच होते. भाजपाने उपमुख्यमंत्रिपदावरच समाधान मानले. गतिमान कारभार, अनेकविध नाविण्यपूर्ण योजना, जनकल्याणकारी निर्णयांच्या भरवशावर पुन्हा एकदा राज्यात युतीचेच सरकार स्थापन होईल, असा विश्‍वास त्यावेळी दोन्ही पक्षांना होता. मात्र, मतदारांनी युतीला नाकारत राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीच्या पारड्यात आपले दान टाकले. त्यामुळे युतीच्या आमदारांना विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली. त्यानंतर सत्तापालट होण्यासाठी 2014 पर्यंतची प्रतीक्षा भाजपा आणि शिवसेनेला करावी लागली. परंतु, या निवडणुकीत हे दोन्हीही पक्ष स्वतंत्र लढले आणि नंतर नाईलाजास्तव का होईना? जनतेला दाखविण्यासाठी एकत्र नांदले. हा देखावा सत्तेसाठीचा करार होता, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्याची मुदत संपताच काय घडले? याचे चित्र आज आपल्यासमोर आहे. 2014 मध्ये भाजपा 122 जागांवर निवडून आल्यानंतर 63 जागा मिळविणार्‍या शिवसेनेचे युतीमधील महत्त्व कमी झाले. शिवसेना हा पक्ष केंद्र आणि राज्यातील सरकारमध्ये भाजपासोबत सहभागी असला, तरी सर्वात जुना मित्रपक्ष म्हणून दोन्ही ठिकाणी दुय्यम वागणूक मिळत असल्याची बोच शिवसेना नेत्यांनी अनेकदा बोलून दाखविली. मग अयोध्या ते राफेल, मुंबईतील मेट्रो प्रकल्प ते नाणार, शेतकरी कर्जमाफी इत्यादी विविध मुद्यांच्या आधारे भाजपाला खिंडित गाठण्याचे काम शिवसेनेकडून केले गेले. मात्र, या दबावतंत्राला भाजपा फारसा बधला नाही. ‘आलात तर तुमच्यासह आणि नाही आलात तर तुमच्याशिवाय’, अशी ताठर भूमिका काही प्रसंगात भाजपानेही घेतली. संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिवसेना नेत्यांनी 2019 मध्ये वेळ येताच वर्मी घाव घालण्याचे काम केले. त्यामुळे भाजपा धाराशायी झाला आहे. त्यातून सावरण्यासाठी त्यांना बरेच दिवस लागले. हे वास्तव जनतेसमोर आहे. शिवसेनेने खमकेपणाने भाजपाशी काडीमोड घेणे हेच नवे राजकीय वळण ठरले आहे. कोर्टात घटस्फोट मिळवून घेण्यासाठी अशिल (वादी) वकिलाच्या माध्यमातून वेगवेगळे आरोप प्रतिवादीवर लावत असतो. त्यात काही खरे तर काही खोटे असतात. तोच प्रकार आताही दोन्ही बाजूने घडला असावा. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड जी चर्चा झाली तीच काडीमोड घेण्याचे मूळ कारण ठरली आहे. हा वाद जनतेसमोर आला असला, तरी कोणाची बाजू सत्य आहे हे सांगणे कठीण आहे. या खेळीत आज शिवसेनेची सरशी झाली आहे. प्रतिवादी हतबल झाला आहे.

2014 मध्ये वेगवेगळे लढण्याची झालेली चूक यावेळी भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांनी टाळली. परंतु, निकालानंतर संपूर्ण चित्र पालटले. 288 पैकी 56 जागा जिंकणार्‍या शिवसेनेने मुख्यमंत्रिपद आणि सत्ता वाटपाचे 50-50 टक्के सूत्र या दोन मुद्यांवरून 105 जागा जिंकलेल्या भाजपावर डोळे वटारले. ‘मुंगी’ने हत्तीच्या कानात शिरून त्याला जेरीस आणण्याचा हा प्रकार ठरला. समोरचा बधत नाही म्हटल्यावर आपले उपद्रवमूल्य सिद्ध केले आणि जे घडूच शकणार नाही, असे अनेकांना वाटत होते त्याच मार्गावर शिवसेना गेली. भाजपाची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा केला. उद्धव ठाकरेंची ही खेळी अनेकांना चकित करणारी असली, तरी त्यामुळे भाजपाला जमिनीवर आणण्याचे काम केले आहे. गेल्या पाच वर्षातील सत्तासुखामुळे भाजपा सुखावली होती. काहीही होवो, आपलेच सरकार येणार अशा भ्रमात असलेल्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या विरोधात महाराष्ट्रात भाजपा रस्त्यावर उतरला आहे. संघटनात्मक निवडणुकांच्या माध्यमातून 90 हजार बूथवर पक्ष अधिक बळकट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पक्षाची नाळ जनतेशी जोडण्याचे काम पुन्हा सुरू झाले आहे. सत्ता नसताना पक्ष कामाला लागला आहे. म्हणजेच भाजपालाही एक चिमटा हवाच होता, असेही म्हणता येऊ शकते. कदाचित यातून येत्या काही दिवसात, महिन्यात अथवा वर्षात भाजपाच्या बाजूने चांगले काही घडू शकेल. पण तोपर्यंत त्यांना दररोज शिवसेनेकडे पाहून मनस्ताप मात्र, सहन करावाच लागणार आहे. भाजपाशी पंगा घेणारे चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी, गांधी परिवार, लालूप्रसाद यादव, मुलायमसिंह यादव यासारख्या विरोधकांची काय अवस्था झाली आहे? हे आज देश पाहत आहे. विरोधकच शिल्लक ठेवले नसल्याच्या गावगप्पा ज्या पारावर रंगविल्या गेल्या त्यालाच गनिमी काव्याने बत्ती देण्याचे काम उद्धव ठाकरे व खा. संजय राऊत यांनी केले आहे. देशातीलच नव्हे, तर जगातील सर्वाधिक सदस्यसंख्या असलेल्या भाजपाला भिडणे हे तेवढे सोपे नव्हते. ते धारिष्ट्य शिवसेनेच्या नेत्यांनी दाखविले आहे. भाजपाच्या विरोधात आमच्यासारखे इतरही उभे राहू शकतात हेच सुचविण्याचे काम या माध्यमातून केले गेले आहे. महाशिवआघाडीची सत्ता आल्यास केवळ राज्यातीलच तर नव्हे, देशातील राजकीय गणिते बदलतील. भाजपाविरोधकांच्या तंबूत शिवसेना विसावलेली असेल. तिथेही महाराष्ट्रातील अभ्यासाची उजळणी होईल आणि गृहपाठ इतर राज्यातील प्रादेशिक पक्षांना दिला जाईल. त्या आधारे मोदींना शह देण्याचा प्रयत्न होईल. भाजपाचे अजेंडे ठरलेले आहेत. त्यानुसार अयोध्येत श्रीराम मंदिर, जम्मू व काश्मीरमधून कलम 370 हटविणे, कर प्रणालीत सुधारणा, कालबाह्य कायदे बदलणे, ट्रिपल तलाकवर प्रतिबंध आणणे आदी लक्ष्य आतापर्यंत साध्य झाली आहेत. समान नागरी कायदा, अखंड भारत होणे बाकी आहे. भाजपाला आपल्या स्वप्नातला देश खरोखर साकार करायचा असेल, तर त्यांना छोट्या मित्रपक्षांना सोबत घेणे आवश्यक राहणार आहे. हीच बाब शिवसेनेच्या नेत्यांनी हेरली असावी. उद्धव ठाकरेंनी भाजपाला वाकुल्या दाखवत एक पाऊल पुढे टाकले आहे पण त्यात धोकेही बरेच आहेत. ते काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सोबत सत्ता स्थापनेचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, या तीनही पक्षांची विचारणसरणी एकदम विभिन्न आहे. त्यांचे सरकार स्थापन झाले तरी ते किती दिवस टिकून राहील याविषयी साशंकता आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 104 जागा जिंकणारा मोठा पक्ष म्हणून भाजपा समोर आला, तरी त्याला सत्तेपासून लांब ठेवायचे म्हणून काँग्रेस (78) आणि जेडीएस (37) या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. परंतु, त्यांचे सरकार फार दिवस टिकले नाही. मुख्यमंत्र्यांवर अक्षरशः रडण्याची वेळ आली. हाच प्रसंग (सत्ता जाण्याचा) महाराष्ट्रात उद्भवू शकतो हे उद्धव ठाकरे यांनी पक्के ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ मिळावी म्हणून ते धडपडत आहेत पण या दोन्ही पक्षांना महाराष्ट्रात शिवसेना मोठे होणे आवडेल का? राष्ट्रवादीला सोबत घेताना काँग्रेस नेहमीच आपले वर्चस्व कसे अबाधित राहिल हे बघत आला आहे. हीच नीती शिवसेनेच्या बाबतीत कधीच अवलंबिली जाणार नाही, असेही म्हणता येणार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंना सावध राहावे लागणार आहे. भाजपाची कशी जिरवली म्हणून शिवसेनेतील अनेकजण आज खूश असतील परंतु, उद्या डोके बडवून घेण्याची वेळ येऊ नये या हिशेबाने सावधगिरीने पावले उचलत राहणे त्यांच्यासाठी आवश्यक राहील. शिवसेनेने चुकीचे आरोप करून काडीमोड घेणे भाजपाही सहन करणार नाही. त्यामुळे महाशिवआघाडीची सत्ता स्थापन झाल्यावर तीनही पक्षांची कसोटी लागणार आहे. भाजपाला सहजपणे घेण्याचा अतिआत्मविश्‍वास आत्मघातासही कारणीभूत ठरू शकतो. कारण, शिवसेनेचे प्रयत्न सुरू असताना तिकडे भाजपाही आमचेच सरकार येणार म्हणून आजही दावा ठोकत आहे. या काटाकाटीच्या खेळात शिवसेना जिंकल्यास हिरो ठरेल, अन्यथा झिरो होण्याचे दुर्भाग्यही पक्षाच्या नशिबी असेल. अशावेळी अपयशाचा हा वाटा स्वीकारण्यास इतर कोणीही पुढे येणार नाही.