शिवसेनेपुढे पर्यायच नाही, भाजपाला मदत करावीच लागणार!

0

जळगाव जिल्ह्यात भाजपा मोठा भाऊ, स्थानिक स्वराज्य संस्थांवर आहे वर्चस्व

जळगाव । जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या या रणधुमाळीत प्रत्येक पक्ष आपापली ताकद दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे. भाजपाचे वर्चस्व असलेल्या जिल्ह्यात शिवसेना देखील यात मागे राहिली नाही. जिल्ह्यात शिवसेनेचे एक राज्यमंत्री असले तरी ताकद दाखविण्यासाठी शिवसेनेने युतीधर्म बाजूला सारत भाजपासोबत ‘असहकार’चा नारा दिला आहे. असे असले तरी जिल्ह्यात भाजपाच मोठा भाऊ असल्याने शिवसेनेला काहीही झाले तरी भाजपाला मदत करावीच लागेल अन्यथा रावेर मतदारसंघात शिवसेना नावाला शिल्लक असल्याचे जसे चित्र आहे तशीच परिस्थिती जिल्ह्यातही निर्माण होण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे.
केंद्रात आणि राज्यात युती असली तरी जळगाव जिल्ह्याचे युतीचे सूत्रच वेगळे राहिले आहे. माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी शिवसेनेसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘युती’ला थारा न दिल्याने भाजपाची ताकद वाढली. गत 20 वर्षापासून जिल्ह्यात हीच स्थिती कायम राहिली असल्याने त्याचे परिणाम देखील भाजपाच्या दृष्टीने फायद्याचेच राहिले आहे. भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये विळ्या-भोपळ्याचे नाते आहे. निवडणुकीत आणि निवडणुकीनंतरही या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये कुरघोडीचे राजकारण या जिल्ह्याने अनुभवले आहे. एवढेच नव्हे तर माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांचा शिवसेना नेते माजी आ. सुरेशदादा जैन आणि सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या सोबत राहिलेल्या सत्तासंघर्षाचे पडसाद थेट विधानसभेपर्यंत उमटले आहे. मात्र या सत्तासंघर्षाचा फायदा भाजपालाच झाला आहे.

‘असहकार’ कशासाठी?
भाजपाकडून जिल्ह्यात शिवसेनेला दुय्यम वागणूक दिली जात असल्याने राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदार संघातील धरणगाव शहरातील पदाधिकार्‍यांनी बुधवारी भाजपाला निवडणुकीत मदत न करण्याचा ठराव केला आहे. तसेच भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे काही दिवसांपूर्वी शिवसैनिकांनी देखील खडसेंना पर्यायाने भाजपाला मदत न करण्याचा ठराव केला आहे. मूळात जळगाव ग्रामीण या मतदारसंघात भाजपाचे पी.सी.पाटील यांचा देखील मोठा प्रभाव आहे. दुसरीकडे धरणागाव तालुका हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला मानला जातो. तर वरणगाव परिसरात भाजपाचे वर्चस्व आहे. त्यामुळे शिवसेनेने असा ठराव केला असला तरी तो फारसा परिणामकारक ठरण्याची शक्यता कमीच आहे.

जिल्ह्यातही शिवसेनेची ताकद कमीच
जळगाव जिल्ह्यात भाजपापेक्षा शिवसेनेची ताकद कमीच आहे. भाजपाचे सहा आणि दोन विधानपरिषद सदस्य असे आठ आमदार आहेत. तर शिवसेनेचे अवघे तीन आमदार आहेत. तसेच भाजपाचे 33 तर शिवसेनेचे 14 जिल्हा परिषद सदस्य आहेत. बहुतांश नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदी भाजपाचेच प्रतिनिधी विराजमान आहे. जळगाव महापालिकेत देखिल महापौर भाजपाचा आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजपा हाच मोठा भाऊ राहिला आहे. एक अपरिहार्यता म्हणून का होईना शिवसेनेला मदत करावीच लागणार आहे.

शिवेसनेसाठी ‘आदेश’ महत्वाचा
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी युतीची संयुक्त घोषणा केली आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा आदेश हा शिवसैनिकांसाठी प्रमाण मानला जातो. पक्षप्रमुखांनी भाजपाला मदत करण्याची भूमिका स्वीकारल्याने राज्यात सर्वत्र भाजपाला आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने सहकार्याची भूमिका ठेवावीच लागणार आहे.

मदत नाही केली तरी भाजपाच वरचढ
जिल्ह्याचा पूर्वइतिहास लक्षात घेता शिवसेनेने भाजपासोबत ‘असहकार’ पुकारला असला तरी त्याचा फारसा परिणाम जाणवला नसल्याचे वरील आकडेवारीवरून लक्षात येते. त्यामुळे लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपाला मदत नाही केली, तरी भाजपाचे फारसे काही बिघडणार नसल्याचे राजकीय जाणकार सांगतात. मात्र याचे परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसून येतील व त्यावेळी सेनेचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता
येणार नाही.