शेकडो वर्षाची परंपरा खंडित ; काकरदेला खंडेराव महाराजांची यात्रा स्थगित

0

नंदुरबार: कोरोनामुळे काकरदे गावातील खंडेराव महाराजांची यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे भक्तांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. शेकडो वर्षाची परंपरा असलेली खंडेराव महाराजांची यात्रा प्रथमच स्थगित करण्यात आली आहे. मंगळवारी, 28 एप्रिल रोजी ही यात्रा भरणार होती. मात्र, कोरोनाचे संकट टाळण्यासाठी परंपरा खंडित करून यात्रा स्थगित करावी लागली आहे. त्यामुळे हजारो लोकांनी गजबजणारी यात्रा ओस पडल्याचेही चित्र आहे.
‘येळकोट…येळकोट…जय मल्हार…खंडेराव महाराज की जय’ असा यात्रेनिमित्त गगनभेदी आवाजाने गुंजणारा जयघोष निःशब्द झाला आहे. खोबरे भंडार्‍याची उधळणही थांबली आहे. बारागाड्यांचा ओढल्या जाणार्‍या रथचक्रालाही ब्रेक लागला आहे. त्यामुळे हजारो भाविक भक्तांची होणारी गर्दी गायब झाली आहे. सर्वत्र सन्नाटा पसरला आहे. मंदिर परिसराचा चौक सुनसान झाल्याचे चित्र पसरले होते.