आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघातील वृक्षांची रातोरात कत्तल

0

मुंबई : शिवसेनेकडून आरेमधील वृक्षकत्तीलवरून भाजपावर टीका करण्यात आली होती. वृक्ष कत्तल सहन केली जाणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला होता. मात्र सध्या पर्यावरण खातं आदित्य ठाकरेंकडेच असतानाच त्यांच्या वरळी मतदारसंघातील चित्र नेमकं उलटं आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात रातोरात झाडांची कत्तल करण्यात आल्याचं उघड झालं आहे. अनेक झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या आहेत. काही वृक्षांना इंजेक्शन देऊन कत्तल केली आहे. याबाबत मनसेकडून महापालिका आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे.

वरळी सी फेस मार्गावरील कावेरी व इतर सोसायटी आवारातील झाडांच्या रस्त्यालगतच्या झाडांची छाटणी करण्यात आली आहे. याठिकाणी काही दिवसांपूर्वी नव्याने बांधण्यात आलेल्या जाहिरात फलकांसाठी ही छाटणी झाल्याचा आरोप मनसेने केला आहे. इतकेच नाही तर शिवसेनेच्या बड्या नेत्याकडे होर्डिंग्स कंत्राट असल्याचा संशय मनसेने व्यक्त केला आहे. पर्यावरण मंत्र्यांच्या मतदारसंघातच अशाप्रकारे वृक्षांची कत्तल करण्यात येते हे योग्य नाही असंही मनसेने सांगितले आहे.

आरेतील झाडे कापणार नाही अशी भूमिका आदित्य ठाकरेंनी घेतली होती. मात्र पर्यावरण मंत्री असतानाचा त्यांच्या मतदारसंघात अशाप्रकारे झाडे कापल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या प्रकरणात मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने झाडे कापण्याची परवानगी दिली होती का? इंजेक्शन देऊन झाडं मारणारे कोण आहेत? या प्रश्नांची उत्तरं मुंबई महापालिका प्रशासन आणि शिवसेनेला द्यावी लागणार आहेत.