शौचालयाच्या सेप्ट टँकमध्ये पडल्याने बालकाचा मृत्यू

0

भुसावळ शहरातील मोहित नगरातील दुर्घटना : सर्वत्र हळहळ

भुसावळ- शहरातील मोहित नगरातील तीन वर्षीय चिमुकल्याच्या शौचालयाच्या सेप्टी टँकमध्ये पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. ईशान अनिल सुतार (तीन) असे चिमुकल्याचे नाव आहे. या प्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

बॉल पकडण्याच्या प्रयत्नात चिमुकला पडला टँकमध्ये
शहरातील मोहित नगरात मोटार मॅकेनिक अनिल सुतार आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांचा एकुलता एक मुलगा ईशान हा शनिवारी सायंकाळी बॉल खेळत असताना तो पकडण्याच्या प्रयत्नात शौचालयाच्या सेप्टी टँकरमध्ये पडला. मयुरेश कन्स्ट्रक्शनचे सुभाषचंद्र भंगाळे यांच्या साईटवर ही घटना घडली. सेप्टी टँकमध्ये पाणी असल्याने बालकाचा गुदमरल्याने मृत्यू झाला. काही वेळानंतर ईशान दिसत नसल्याने कुटुंबियांनी शोधा-शोध सुरू केली असता सेप्टी टँकबाहेर त्याच्या चपला आढळल्यानंतर घटनेचा उलगडा झाला. एकुलत्या एक चिमुकल्याच्या अकाली मृत्यूनंतर मातेने हंबरडा फोडला तर या घटनेनंतर उपस्थितांनाही गहिवरून आले. दरम्यान, बांधकामस्थळी शौचालयाच्या टँकवर झाकण नसल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी सुनील सुतार यांनी शहर पोलिसात दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश कोळी करीत आहेत.