Sunday , January 20 2019
Breaking News

संभाव्य कृती आराखड्यात तब्बल 268 गावपाडे टंचाईग्रस्त

शहापूर । भातसा, तानसा, मोडकसागर तसेच मध्यवैतरणा धरणाचे अथांग पसरलेले पाणी शहापूर तालुकावासीयांच्या डोळ्यांना दिसतंय पण प्यायला मिळत नाही अशी दुर्दम्य अवस्था झालेल्या तालुक्याच्या दुर्गम भागातील पाणीटंचाई महिला भागिनींच्या अक्षरशः पाचवीलाच पुजली आहे. यावर्षीही रणरणत्या उन्हात रानोमाळ भटकून पिण्याच्या पाण्यासाठी चटके खावे लागणार आहेत. पाणीटंचाईने ग्रासलेल्या शहापूर तालुक्यातील गावपाडयांच्या संख्येत गतसालापेक्षा यावर्षी कमालीची वाढ झाली असून यंदाच्या संभाव्य कृती आराखड्यात तब्बल 268 गावपाडे टंचाईग्रस्त असून त्यापैकी तब्बल 194 गाव – पाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार असून त्यासाठी किमान 90 लाख खर्च अपेक्षित आहे. मुंबई महानगरासाठी पाणीपुरवठा करणार्‍या शहापूर तालुक्यातील भातसा, तानसा, मोडकसागर या जलाशयात मुबलक पाणी असतानाही तालुक्यावासीयांचा घसा मात्र कोरडाच राहिला आहे. यावर्षी फेब्रुवारीनंतरच विहिरींनी तळ गाठायला सुरुवात केल्याने ग्रामीण भागातील महिला भगिनींची पाण्यासाठी पायपीट सुरू झाली आहे. पाण्याचे दुर्भिक्षामुळे दुर्गम भागातील महिला भगिनींना डोईवर चार- चार हंडे घेऊन पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. शहापूर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाणीटंचाई व त्यावरील उपाययोजनांचा प्रस्तावित करण्यात आलेल्या आराखड्याला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे. या आराखड्यात 78 गावे आणि 190 पाडे टंचाईग्रस्त असल्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यापैकी 53 गावे व 141 पाडे असे 194 गावपाड्याना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार असून त्यासाठी किमान 90 लाख खर्च अपेक्षित आहे.

टंचाईग्रस्त गावांमध्ये 4 कोटींचा खर्च अपेक्षित
यामध्ये अजनुप, उंबरमाळी, दांड, उम्रवणे, वाशाळा, ढेंगणमाळ, सुसरवाडी, बलवंडी, आंबेखोर, कोठारे आदी 53 गावे व पेढयाचीवाडी, रोजपाडा, खैरपाडा, उंबरपाडा, चिंतामणवाडी, चिंचवाडी, कोळीपाडा, भेकरमाळ, नारळवाडी, बिवलवाडी, पाटोळपाडा, खरमेपाडा, ठाकूरपाडा, पायरवाडी आदी 141 पाड्यांचा समावेश आहे. दरम्यान, टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासह सहा नळ पाणीपुरवठा योजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी 79 लाख, पूरक नळ पाणीपुरवठा योजनांसाठी दोन कोटी व नविन विंधन विहीर बांधणे यासाठी 33 लाख आदी योजना आराखडयात समाविष्ट करण्यात आल्या असून या टंचाईग्रस्त उपाययोजनांसाठी एकूण चार कोटी खर्च अपेक्षित आहे. सन 2009 पासून 2017 पर्यंत व तालुक्यातील टंचाईग्रस्त भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल सव्वाचार कोटी खर्च झाला असून तालुक्यातील पाणीटंचाई कधी संपुष्टात येईल व पाण्यासाठी करावी लागणारी वणवण कधी थांबेल, असा सवाल महिलावर्ग करत आहे.

About admin

हे देखील वाचा

…तर डान्सबारना बंद करण्यासाठी अध्यादेश काढू – सुधीर मुनगंटीवार

मुंबई : राज्य सरकारने घातलेल्या काही अटी आणि शर्ती शिथील करत सर्वोच्च न्यायालयाने डान्स बारना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!