संशयित परस्पर रुग्णालयात दाखल ; न्यायालयाने कारागृह अधिकार्‍यांना फटकारले

0

एरंडोल खून खटला : कागदपत्राही सावळा गोंधळ असल्याने खुलासा करण्याची तंबी

जळगाव : एरंडोल येथील खून खटल्याच्या कामकाजाला शुक्रवारी सुरूवात होणार होती. परंतु यातील दोघा संशयितांना न्यायालयात हजर न करता जिल्हा कारागृह प्रशासनातर्फे जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी परस्पर दाखल करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. न्यायालयाने ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा कारागृह अधिक्षकांना न्यायालयीन कोठडीत संशयीत आरोपी असताना कोणाच्या सांगण्यावरून रूग्णालयात दाखल केले,असा जाब विचारत कडक शब्दात फटकारले. तसेच न्यायालयात सादर केलेल्या सादर करण्यात आलेल्या कागदपत्रातही सावळा गोंधळ दिसून आल्याने न्यायालयाने कारागृह प्रशासनाला याप्रकरणी खुलासा सादर करण्याचीही तंबी दिली आहे.

फिर्यादीला संशयितांच्या धमक्या

उमेश खंडू पाटील यांच्या खून प्रकरणी दाखल गुन्हयात संशयीत दशरथ महाजन तसेच पंकज नेरकर न्यायालयीन कोठडी अंतर्गत कारागृहात वास्तव्यास आहेत. शुक्रवारी या खटल्यात कामकाजाला सुरुवात होणार होती. त्यामुळे फिर्यादी मनोज पाटील न्यायालयात हजर होते. संशयीत कैदी रुग्णालयातील कक्षातून धमक्या देत असल्याचा मुद्दा फिर्यादीने न्यायालयात मुददा मांडला होता. त्यानुसार न्या. हिवसे यांच्या न्यायालयात खटल्याच्या चौकशीकामात संशयीतांना हजर करण्याचे कारागृह प्रशासनाला सुचना केल्या होत्या. दरम्यान या गुन्हयातील संशयीत दशरथ महाजन 24 तारखेपासून रूग्णालयातील कैदी कक्षात जेल प्रशासनाने दाखल केले आहे. तर दुसरा संशयीत पंकज नेरकर याला शुक्रवारी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

कागदपत्रांमध्येही विसंगती

न्यायालयात हजर असलेले कारागृह अधीक्षक गोसावी तसेच अधिकारी पवार यांना यांसदर्भात न्या. हिवसे यांनी विचारणा केली. न्यायालयीन कोठडीत असताना संशयीत आरोपींना कोणाच्या सांगण्यावरून सिव्हीलमध्ये दाखल केले,असा प्रश्न विचारला. संशयीताना रूग्णालयात पाठविले तर कोणाच्या सांगण्यावरून पाठविले अशा शब्दात फटकारले. न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रातही विसंगती दिसून आल्याने न्यायालयाने कारागृह अधिक्षक गोसावी यांच्यावर ताशेरे ओढत याप्रकरणी खुलासा सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके हजर होते.