सफाईच्या ठेक्यात मनपा पदाधिकार्‍यांचा आर्थिक संबंध

0

वॉटरग्रेसचा ठेका रद्द करण्याची भाजपच्या उपमहापौरांसह शिवसेना नगरसेवकांची मागणी

जळगाव : मनपाने वॉटरग्रेस कंपनीला सफाईचा ठेका दिला आहे. मक्तेदाराकडे पुरेसे कामगार नाहीत.त्यामुळे दैनंदिन सफाई होत नसल्याने शहराचे विदु्रपीकरण होत आहे. तसेच मनपा पदाधिकार्‍यांचा यात आर्थिक संबंध दिसून येत असल्याचा आरोप करत सफाईचा ठेका रद्द करावा अशी मागणी दस्तुरखुद्द उपमहापौर डॉ.अश्‍विन सोनवणे यांच्यासह शिवसेनेच्या नगरसेवकांनी उपायुक्त अजित मुठे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. ’जळगावकरांची एकच भूल,कमळाचे फुल’ अशा घोषणा सत्ताधार्‍यांविरोधात देण्यात आल्या.

शहरातील साफसफाई आणि कचरा संकलनासाठी मनपाने सफाईचा ठेका दिला आहे.मात्र गेल्या 15 दिवसांपासून मक्तेदाराने कामबंद केले आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र कचराकोंडी झाली आहे. ठिकठिकाणी कचरा साचलेला असून कचराकुंड्या देखील ओसंडून वाहू लागल्या आहेत. त्यामुळे काही नगरसेवकांसह नागरिकांकडून देखील नाराजी व्यक्त होवू लागली आहे. अकार्यक्षम प्रशासनाचे स्वच्छतेकडे लक्ष वेधण्यासाठी पाच दिवसापूर्वी शिवसेनेचे नगरसेवक बंटी जोशी यांनी आरोग्य विभागात आत्मक्लेश आंदोलन केले. त्यानंतर मंगळवारपासून बंटी जोशी आणि नितीन बरडे यांनी साकळी उपोषण सुरु केले आहे. दरम्यान, बुधवारी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांसह उपमहापौरांनी आंदोलनस्थळी येवून भेट घेतली. सफाईसाठी देण्यात आलेला ठेका रद्द करुन दंडात्मक कार्यवाही करावी अशी मागणी उपायुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.

यांची होती उपस्थिती

यावेळी उपमहापौर डॉ.अश्‍विन सोनवणे, मनपा विरोधी पक्षनेते डॉ.सुनील महाजन,प्रशांत नाईक,नितीन लढ्ढा,विष्णू भंगाळे,नितीन बरडे,बंटी जोशी,मनोज चौधरी,गणेश सोनवणे,जिजाबाई भापसे,राखी सोनवणे, ज्योती तायडे, जयश्री महाजन,शेख शबाना सादीक, इबा पटेल, नीता सोनवणे ,भाजपचे नगरसेवक डॉ. चंद्रशेखर पाटील, धिरज सोनवणे, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, नितीन सपके,मानसिंग सोनवणे, अजय पाटील, शोभा चौधरी,सरिता माळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

सत्ताधार्‍यांमध्ये मतभेद

स्वच्छतेच्या प्रश्‍नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक बंटी जोशी आणि नितीन बरडे यांनी मनपात साखळी उपोषण सुरु केले आहे. महापौर भारती सोनवणे,नगरसेवक कैलास सोनवणे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तर दुसरीकडे उपमहापौर डॉ.अश्‍विन सोनवणे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यामुळे सत्ताधार्‍यांमध्ये मतभेद असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहेत.

लेखी आश्‍वासनानंतर उपोषण मागे

स्वच्छतेसाठी नगरसेवक बंटी जोशी आणि नितीन बरडे यांनी साखळी उपोषण सुरू केले होते. मनपा उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांनीदेखील आश्‍वासन दिल्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले.

घंटागाड्या पुन्हा बंद

सफाई मक्तेदाराने गेल्या 15 दिवसांपासून काम बंद केले आहे. त्यामुळे मनपाच्या कायम सफाई कर्मचार्‍यांच्या माध्यमातून स्वच्छता केली जात आहे. घंटागाड्या देखील बंद होत्या.मात्र प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या सूचनेनुसार घंटागाड्या सुरु झाल्या होत्या.परंतु बुधवारी पून्हा घंटागाडया बंद ठेवण्यात आल्यात.