समाजाला स्वच्छतेची शिकवण देणारे संत गाडगेबाबा

0

अनिल माळी

महाराष्ट्रातील अलीकडच्या काळातील संतांमधील शेवटची कडी म्हणजे संत गाडगे महाराज. खरं म्हणजे संत गाडगे महाराज यांनी नवी परंपरा निर्माण केली. गाडगे महाराजांचे वैशिष्ट्य असे होते की, हा माणूस आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये कुणालाही पाया पडू देईना. जेव्हा लोक संत म्हणून त्यांच्या पाया पडायला यायचे तेव्हा हे त्यांना काठीने मार द्यायचे आणि म्हणायचे-‘माझ्या पाया तुमी कायले पडता, त्यापेक्षा आपल्या आई-बापाच्या पाया पडा!’ असा मोलाचा प्रामाणिक सल्ला ते लोकांना देत. सामाजिक प्रबोधन करण्याचा विडा उचललेला होता. त्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली व त्यांच्या नावाने भव्य अभियान महाराष्ट्रभर राबविण्यात आले.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामुळे महाराष्ट्रातील अनेक खेडी स्वच्छ सुंदर आकर्षक दिसू लागली. ग्रामस्वच्छता अभियानामध्ये अनेक गावांनी लाखोंची बक्षिसे मिळविली. या बक्षीस रकमेतून गावांमध्ये विविध सोयीसुविधा निर्माण करण्यात आले. तसेच गावाची रंगरंगोटी करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रातील खेडी स्वच्छ व सुंदर दिसू लागली. या सर्वांचे श्रेय संत गाडगेबाबा यांच्या नावे द्यावे लागेल. त्यांनी समाजाला स्वच्छतेची शिकवण दिली. त्यातूनच हे ग्रामस्वच्छता अभियान पुढे येऊन महाराष्ट्रामध्ये ते प्रभावीपणे राबविण्यात आले. संत गाडगेबाबा महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार संत आणि थोर समाजसुधारक होते. त्यांनी स्वतःहून साधी व गरीब राहणे स्वीकारले. विसाव्या शतकामध्ये समाजसुधारक आंदोलनामध्ये ज्या महापुरुषाचा सहभाग आहे.त्यापैकी एक नाव आवर्जून घेतले जाते, ते म्हणजे संत गाडगेबाबा.

संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर वैज्ञानिक दृष्टी पाडणारे ते प्रसिद्ध समाजसुधारक होते. संत गाडगे महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य दीनदलित आणि पीडितांच्या सेवेसाठी घालविले. देवळात जाऊ नका, मूर्तीपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, मंत्र-तंत्र चमत्कार अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका, कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, अशी शिकवण संत गाडगे महाराजांनी महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात विखुरलेल्या जनतेला दिली. त्यांनी लोकांनी दिलेल्या पैशातून अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालय, आश्रम, विद्यापीठ सुरू केली. रंजलेले, गांजलेले, दीनदुबळे, अनाथ, अपंग हेच गाडगे महाराजांची देव होते आणि या देवातच गाडगेबाबा अधिक रमायचे. गाडगे महाराजांचा वेश व त्यांचे विचार पाहिले की, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी कशी अंगीकारायची त्याचा प्रत्यय येतो. डोक्यावर खापराच्या तुकड्यांची टोपी, एका कानात कवडी तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू तर दुसर्‍या हातात मडके असा गाडगेबाबांचा पोशाख असायचा.

समाजामध्ये पसरलेले अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी गाडगेबाबांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. गाडगे महाराजांचे कीर्तन म्हणजे एक पर्वणीच असायची. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची दुर्गुणांची व दोषांची जाणीव करून द्यायची. संत गाडगे बाबांचा उपदेश साधा-सोपा लोकांना सहज समजेल असा असायचा. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका, असा उपदेश ते आपल्या कीर्तनातून करायचे. देव दगडात नसून माणसात आहे, हा विचार सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा ते प्रयत्न करायचे. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू म्हणायचे. मी कोणाचा गुरू नाही की कोणी मला शिष्य नाही, असे ते कायम म्हणत असायचे. संत गाडगे महाराजांना माहित होते की, लोकांना आपले विचार पटवून द्यायचे असतील तर आपल्याला त्यांच्याच भाषेचा वापर केला पाहिजे आणि यासाठी साध्याभोळ्या लोकांना समजेल अशा ग्रामीण भाषेचा लोकांच्या वर्‍हाडी भाषेचा उपयोग ते करायचे. देव भोळा माणसांपासून ते नसती कानपर्यंत कोणत्याही वयोगटासाठी वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत. आपले तत्त्वज्ञान पटवून देत. तुकाराम महाराजांप्रमाणेच सत्य ठणकावून सांगण्याचे धैर्य बाबांमध्ये होते. गाडगेबाबांनी स्वच्छतेची शिकवण दिली. अनेक गावांनी, शाळांनी या अभियानाअंतर्गत आपली गावे व शाळा स्वच्छ केली. अत्यंत ताकदीने बुध्दीप्रामाण्यवाद मांडणारे चमत्कारांना विरोध करणारे संत गाडगे महाराज 1956 साली जगाचा निरोप घेतला. आपण सुद्धा त्यांच्या विचारांचे आचरण करून त्यांना त्यांच्या जयंतीदिनी अभिवादन करु या.