सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है

0

प्राचार्य डी.एफ. पाटील

सुप्रसिद्ध क्रांतिकारक महान देशभक्त विचारवंत शहीद भगतसिंग आणि त्यांचे सहकारी मित्र सुखदेव व राजगुरू या तीन क्रांतिकारकांना 23 मार्च 1931 या दिवशी लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये ब्रिटीश सरकारने फाशी दिली. शहीद भगतसिंग यांचे जीवन व कार्य तसेच त्यांच्या सहकार्‍यांचे स्वातंत्र्य चळवळीतील कार्य उल्लेखनीय असेच आहे.

भारतामध्ये ब्रिटीशांचे जुलमी अत्याचारी राजवट होती. ब्रिटीश राजवटीने भारतीय जनतेचे आर्थिक शोषण केले. ब्रिटीशांची राजवट नष्ट करण्यासाठी भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी लाखो देशभक्त, महान नेते, हजारो क्रांतिकारकांनी प्रयत्न केले. भारतात क्रांतिकारकांच्या अनुशीलन समिती, युगांतर, गदर संघटना, अभिनव भारत संघटना, अभिनव भारत संघटना, नौजवान भारत सभा, हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लीकन असोसिएशन या क्रांतिकारक संघटनांची स्थापना झाली. शहीद भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी लायतपूर जिल्ह्यातील बंगा या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव किशनसिंग व आईचे नाव विद्यावती होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण बंगा या गावी झाले. हायस्कूलचे शिक्षण डी.ए.व्ही.स्कू ल, लाहोर येथे झाले. तसेच महाविद्यालयातील शिक्षण नॅशनल कॉलेज लाहोर येेथे झाले. भगतसिंग, काका अजितसिंग, काका स्वर्णसिंग या सर्वांना स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला.

भगतसिंगांची प्रेरणास्थाने

रशियन राज्यक्रांतीचे थोर क्रांतीकारक लेनिन यांच्या विचारांचा भगतसिंग यांच्यावर प्रभाव पडला तसेच गदर पार्टीचे सुप्रसिद्ध क्रांतिकारक हुतात्मा कर्तारासिंग सरामा यांच्या कार्याचा प्रभाव पडला. प्रसिद्ध क्रांतिकारक महाजन देशभक्त सरदार अजितसिंग या त्यांच्या काकांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. ही त्यांची प्रेरणास्थाने होती. भगतसिंग बारा वर्षांचे असतांना 13 एप्रिल 1919 मधये अमृतसर येथे जालियनवाला हत्याकांड झाले. या घटनेचाही यांच्या मनावर परिणाम झाला.

1920 मध्ये महात्मा गांधींनी असहकारकतेची चळवळ सुरू केली. “हे सैतानी सरकार सुधरू शकत नाही. ते संपविलेच पाहिजे” असे गांधीजींनी म्हटले. या असहकारतेच्या चळवळीत जनतेने मोठ्या संख्येने भाग घेतला. या चळवळीने संपूर्ण देशाला जागृत केले. 1922 मध्ये उत्तरप्रदेशातील ‘चौरीचौरा’ येथे जमावाने पोलीस चौकीला आग लावून दिली व त्यात काही पोलीस मरण पावले. ही हिंसा झाली म्हणून महात्मा गांधींनी असहकारतेची चळवळ मागे घेतली. सुप्रसिद्ध इतिहासकार प्रा. बिपनचंद्र यांनी नोंद केली आहे की, असहकाराच्या सत्याग्रहात भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सूर्यसेन, सुखदेव, जतीनदास, भगवतीचरण बोहरा, जगदीशचंद्र चॅटर्जी, यशपाल, शिवशर्मा, गयाप्रसाद व जयदेव कपूर या सर्व तरूणांचा समावेश होता.

गांधींनी असहकार चळवळ मागे घेतली. त्यावेळी जेलमधून चित्तरंजनदास, मोतीलाल नेहरु, लाला लजपतराय, नेताजी सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू या नेत्यांनी गांधीजींना विरोध केला होता. पण गांधीजी आपल्या निर्णयावर ठाम राहिले. तरूणांना सुद्धा गांधीजींचा हा निर्णय आवडला नाही व ते नवीन मार्गाच्या शोधात लागले. नॅशनल कॉलेज लाहोर येथे शिक्षण घेत असतांना त्यांचे मित्र व सहकारी सुखदेव, यशपाल, भगवतीचरण वोहरा हे होते. यांच्यावर 1917 मध्ये रशियामध्ये जी राज्यक्रांती झाली. लेनिनने जुलमी अत्याचारी झारशाही राजवट नष्ट केली. साम्राज्यवादाला विरोध, समाजवादी राजवट, या विचारांची या तरूणांवर प्रभाव पडला. भगतसिंग, सुखदेव, यशपाल, भगवतीचरण यांनी लाहोर येथे नौजवान भारत सभेची स्थापना केली.

थोर क्रांतिकारक सचिंद्रनाथ संन्याल, रामप्रसाद बिस्मिल या क्रांतीकारकांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली. संन्याल यांनी लिहिलेल्या ‘बंदीजीवन’ हे पुस्तक क्रांतिकांमध्ये लोकप्रिय ठरले.

कानपूर येथे काँग्रेसचे सुप्रसिद्ध नेेते आणि प्रताप वृत्तपत्राचे संपादक गणेश शंकर विद्यार्थी यांच्याकडे भगतसिंग गेले. कानपूर येथे समाजवादी व कम्युनिस्ट विचारसरणीचे क्रांतिकारकांशी त्यांच्या भेटी झाल्या. चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वरदत्त, शिववर्मा, विनयकमल सिन्हा, जयदेव कपूर, तसेच मौलाना हसरत मोहानी, सत्यभक्त शौकत उस्मानी यांच्याशी त्यांच्या भेटीगाठी झाल्या. चर्चाविनिमय झाला. क्रांतिकारकांना शस्त्रास्त्रांची गरज होती. त्यासाठी पैशांची आवश्यकता होती म्हणून भगतसिंग व त्यांचे सहकारी चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, अशपाक उल्लाखान, ठाकुर रोशनसिंग, राजेंद्र लाहीरी, मंगनाथ गुप्ता या क्रांतिकारकांनी 9 ऑगस्ट 1925 रोजी काकोरी रेल्वेस्टेशनवर रेल्वेचा खजिना लुटला. पुढे या काही क्रांतिकारकांना पकडण्यात आले. 17 डिसेंबर 1927 रोजी राजेंद्र लाहाडी यांना फाशी देण्यात आली. 19 डिसेंबर 1927 रोजी रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्लाखान, ठाकुर रोशनसिंग या क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली. रामप्रसाद बिस्मिल यांचे सुप्रसिद्ध गीत स्वातंत्र्य चळवळीत अतिशय लोकप्रिय ठरले. ते गीत होत.
“सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है
देखना है जोर कितना बाजुएं कातिल में है”
दिल्ली येथे भगतसिंग व त्यांच्या सहकार्‍यांची 8 व 9 सप्टेंबर 1928 रोजी फिरोजशहा कोटला मैदानांवर क्रांतिकारकांची ऐतिहासिक बैठक झाली. या बैठकीत हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन यांच्या नावात समाजवादाचा समावेश करण्यात आला व त्याचे नाव हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ठेवण्यात आले. लाहोर येथे सायमन कमिशन आले. या कमिशनला जनतेने प्रचंड विरोध केला. ‘सायमन गो बॅक’ ‘सायमन मुर्दाबाद’ म्हणून घोषणा दिल्या. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे लाला लजपतराय यांच्यावर लाठीहल्ला झाला व त्यात ते जखमी झाले. मग काही दिवसांनी त्यांचे निधन झाले. (क्रांतिकारकांनी ठरवले की) क्रांतिकारक चंद्रशेख आझाद, भगतसिंग, राजगुरू, जयगोपाल यांनी ठरवले की पोलिस अधिकारी स्कॉट याला धडा शिकवला पाहिजे. त्यासाठी त्यांनी जयगोपालने इशारा केल्यानंतर राजगुरूने पोलिस अधिकार्‍यावर गोळी झाडली. अधिकारी मोटारसायकलवरून खाली पडला. भगतसिंगांनी त्यांच्यावर 2/3 गोळ्या झाडल्या. जो अधिकारी मेला तो जे.पी.सँडर्स होता.
लाहोर शहरात पोस्टर लागले
“अत्याचारी सरकार सावधान !”
हिंदुस्थान समाजवादी प्रजातंत्र सेना
असे पत्रकावर लिहिलेले होते व खाली
इंकलाब जिंदाबाद ! असे लिहिलेले होते.
8 एप्रिल 1931 रोजी सार्वजनिक सुरक्षा विधेयक आणि औद्योगिक विवाद विधेयक केंद्रीय विधानसभेत ही विधायके आली असता भगतसिंग व बटुकेशवर दत्त यांनी असेंब्लीत 2 बॉम्ब फेकलेत. त्यावेळेस त्यांनी घोषणा दिल्या. “इन्कलाब जिंदाबाद! साम्राज्यवाद मुर्दाबाद” बहिर्‍यांना ऐकवण्यासाठी मोठ्या आवाजाचीच गरज भासते हे सुप्रसिद्ध फ्रेंच हुतात्मा वॉलियाँ यांचे अमर शब्द आहेत. वरील दोन्ही कृत्ये, सँडर्सची हत्या आणि असेंब्लीत बॉम्ब यामुळे भगतसिंग व त्यांचे साथीदार देशभरात वीरनायक बनले. भगतसिंग व त्यांच्या सहकार्‍यांनी त्यांना मिळणार्‍या वाईट वागणूक व छळाविरूद्ध त्यांनी तुरूंगात उपोषण केले. 13 सप्टेंबर 1929 मध्ये 63 व्या दिवशी यतींद्रनाथ दास शहीद झाले. या घटनेचा जनतेवर मोठा परिणाम झाला.

लाहोर कटाच्या खटल्यात भगतसिंग राजगुरू, सुखदेव या तीन क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. शिववर्मा, किशोरीलाल, महावीरसिंग, विजयकुमार सिन्हा, गयाप्रसाद, जयदेव कपूर व कमलनाथ तिवारी यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. शिववर्मा यांनी आपले मित्र व सहकारी भगतसिंग यांच्याबद्दल म्हअले “वैचारिकदृष्ट्या भगतसिंग हा आम्हा सर्वांचा निर्विवाद नेता होता” अपार धाडस, अप्रतिम शौर्य हे भगतसिंगांचे इतर गुण होते. तुरूंगात असतांना भगतसिंग यांनी समाजवाद व मार्क्सवादाचा सखोल अभ्यास केला. वीरअर्जुन, प्रताप, किती या वृत्तपत्रातून त्यांनी लेख लिहिले. ‘मी नास्तिक का आहे” ही अभ्यासपूर्ण पुस्तिका लिहिली. फाशीवर जाण्यापूर्वी भगतसिंग रशियन राज्यक्रांतीचे थोर क्रांतिकारक नेते लेनिन यांची जीवनगाथा हे पुस्तक वाचत होते.

“थांबा एक क्रांतिकारक दुसर्‍या क्रांतिकारकाला भेटत आहे” असे भगतसिंग म्हणाले. +23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांनी फाशी जाण्यापूर्वी इन्कलाब जिंदाबाद ! साम्राज्यवाद मुर्दाबाद ! म्हणून घोषणा दिल्या. शहीद झाल्यानंतर भगतसिंग क्रांतिचे प्रतीक बनले. भगतसिंग यांनी इन्कलाब जिंदाबाद ! ही घोषणा जनतेत अतिशय लोकप्रिय केली. भगतसिंग आजच्या तरूण पिढीसाठी आदर्श व प्रेरणादायी आहेत. जसे मागील पिढीचे आदर्श बनले होते. स्वातंत्र्यासाठी समाजवाद, धर्मनिरपेक्षतता यासाठी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव शहीद झाले. या महान क्रांतिकारकांना, शहिदांना विनम्र अभिवादन!