सांगवीजवळ दुचाकी अपघातात पोलीस कर्मचार्‍यासह दोघे जखमी

0

यावल- भालोद-सांगवी रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सहा वाजता घडली. जखमींमध्ये अमळनेर उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे वाहनचालक आणि कॉन्स्टेबल चंपालाल रमण पाटील यांचा समावेश आहे. जखमींवर यावल ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे

वळणावर धडकल्या दुचाकी
अमळनेर उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे शासकीय वाहनावरील चालक कॉन्स्टेबल चंपालाल रमण पाटील (45) हे पत्नी बन्सुबाई चंपालाल पाटील (42) यांच्यासोबत दुचाकीवर नातेवाईकांकडे वनोली, ता.यावल येथे गेले होते. यावलकडून भालोदकडे दुचाकीवर जात असलेल्या चंदुलाल ईश्वर नारेकर (28, रा. यावल) याने वळणावर वनोली येथून परत येताना चंपालाल पाटील यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. चंदुलाल नारेकर यांच्यासह चंपालाल पाटील हे दोघे गंभीर जखमी झाले तर बन्सुबाई पाटील या किरकोळ जखमी झाल्या. जखमींना तत्काळ यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.रश्मी पाटील, संगीता डहाके यांनी प्रथमोपचार केले. चंपालाल पाटील यांचे डोके आणि डोळे तर चंदुलाल ईश्वर नारेकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे.