साखरपुडा झाला…लग्नाची तारीखही ठरली…अन् 11 लाख रुपये हुंडा न दिल्याने मोडला विवाह

0

बडोदा येथील वायुदलातील तरुणासह त्याच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव: रितीरिवाजाप्रमाणे मुलगा-मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरला, मुलाने-मुलीने एकमेकांना पसंत केले. यानंतर साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडून लग्नाची तारीख टाकली. वधूकडील मंडळींकडून लग्नाची तयारी सुरु असतांना तरुणाच्या कुटुंबियांनी मुलगा वायुदलात असल्याने 11 लाख रुपये हुं÷ड्यांची मागणी केली. ऐपत नसल्याने एवढा हुंडा देण्यास मुलीच्या कुटुंबियांनी नकार दिल्याने तरुणाकडील कुटुंबियांनी जुळलेला विवाह मोडला आहे. यादरम्यान तरुणाने या काळात लग्नापूर्वीच तरुणीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असेही कृत्य केले. याप्रकरणी शिरसोली येथील मुलीच्या फिर्यादीवरुन वायुदलात कार्यरत तरुण चेतन दिलीप बडगुजर मूळ. पिंपळगाव हरेश्वर, ह.मु. मराठा कॉलनी, बदोडा, गुजरात यांच्यासह त्याची आई, मुंबईच्या दोन्ही बहिणींविरोधात अशा चौघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्न मोडेल असा तसूभरही विचार केला नसल्याने मुलीने लग्नानंतरचे सुखी संसाराचे स्वप्न रंगविले होते. मात्र विवाह मोडल्याने तिचा स्वप्न भंग झाला असून आनंद नव्हे निराशा तिच्या पदरी पडली आहे.

लग्नाचे पक्के ठरले….
शिरसोली येथे तरुणी ही वडील, आई, भाऊ यांच्यासह वास्तव्यास आहे. तिचे बी.टेकचे शिक्षण पूर्ण झालेले आहे. गेल्या वर्षी कुटुंबियांनी तरुणीच्या होकारानुसार विवाह करण्याचे ठरले. त्यानुसार स्थळ पाहण्यास सुरुवात केली. यादरम्यान नातेवाईक अशोक बडगुजर यांनी तरुणीच्या वडीलांना पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव येथील मुलाचे स्थळ सुचविले. मुलगा ग्वालियर येथे वायुदलात नोकरीला असल्याचे सांगितले. बायाडेटा व मुलाचा फोटो बघितल्यावर या स्थळाला तरुणीने पसंती दिली. त्यानुसार 15 जून 2016 रोजी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. मुलगा चेतन, आई कल्पना, त्याची मुंबई येथील बहिण आरती बडगुजर, तिचे पती महेंद्र बडगुजर, चुलत भाऊ भरत मधुकर बडगुजर, रा. पिंपळगाव हरेश्वर हे मुलीला पाहण्यासाठी आले होते. तरुणी व चेतन या दोघांना एकमेकांना पसंत केले. या नुसार या दोघांच्या परिवाराकडून लग्नाचे पक्के ठरले.

साखरपुडाही पार पडला
दोघांकडील परिवाराच्या संमतीने महिनाभरानंतर 27 जुलै रोजी साखरपुडाही पार पडला. यात मुलीकडील मंडळींनी लग्न सोहळा थाटात पार पाडून द्यावा, अशी इच्छा चेतनच्या आईने व्यक्त केली. त्यानुसार 12 फेब्रुवारी ही लग्नाची तारीखही निश्चित करण्यात आली. मुलीकडील मंडळी तरुणाकडे बदोड्याला जावून आले. लग्न पक्के झाल्याने दरम्यानच्या काळात चेतन बदोडा येथे तरुणीसोबत तिचा विरोध असतांनाही अश्लिल हावभाव करुन मनाला लज्जा वाटेल, असे कृत्य केले, यानंतर चेतनेने तरुणीला पद्मालय, यानंतर जळगाव शहरातील खान्देश सेंट्रल मॉल येथे फिरावायला नेले. तरुणीला आयनॉक्समध्ये चित्रपटही ही दाखविला. या वेळी त्योन तिच्या अंगलटपणा केला होता. मात्र लग्न निश्चित असल्याने तरुणीने याबाबत कुणाकडेही वाच्यता केली नाही.

एकीकडे लग्नाची तयारी सुरु अन् मोडले लग्न
लग्नासाठी शहरातील सैनिक कल्याणचा हॉलही निश्चित झाला. यानंतर मुलीकडील मंडळींकडून लग्नाची तयारी सुरु असतांना 3 डिसेंबर 2019 रोजी सकाळी तरुण चेतनची आई मुलीच्या घरी धडकली. लग्नासाठी 11 लाख रुपये हुंडा लागेल, नाहीतर लग्न रद्द असे बोलून तिने तयारीत व्यस्त मुलीच्या कुटुंबियांना धक्काच दिला. मुलीच्या आई वडीलांना आमची तेवढी एैपत नाही, असे म्हणून मुलाच्या आईकडे गयावया केली. मात्र तीने एैकले नाही.

मुलासह कुटुंबियांविरोधात विनयभंग,फसवणूकीचा गुन्हा
यानंतर तरुणीने प्रकाराबाबत चेतनला फोन केला. मात्र त्यानेही मी सेंट्रल गर्व्हमेंटच्या नोकरीला असून तुम्हाला 11 लाख रुपयेच द्यावे लागेल, नाहीतर लग्न मोडले असे समजा, असे सांगून नकार दिला. यानंतर नातेवाईक, मध्यस्थीमार्फत मुलीच्या कुटुंबियांनी चेतनसह त्याची आई दोन्ही बहिणींना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी शेवटी लग्न रद्द करुन विश्वासघात तसेच फसवणूक केली. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरुन तरुण चेतन बडगुजरसह त्याची आई कल्पना दिलीप बडगुजर, बहिण आरती महेंद्र बडगुजर, कुसूम अरविंद बडगुजर, दोन्ही रा. कल्याण यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात 354, 420,509 34 व हुंडा प्रतिबंधित अधिनियम कलम 4 या नुसार गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस निरिक्षक विशाल सोनवणे करीत आहेत.