साडेतीन वर्षाच्या आजारी मुलासाठी थेट राजस्थानवरुन मुंबईत पाठवले सांडणीचे दूध

0

मुंबई – माझा साडेतीन वर्षाचा मुलगा स्वमग्न (ऑटेस्टीक) या दुर्धर आजाराने ग्रासलेला आहे. त्यामुळे त्याला बकरी, गाय आणि म्हशीचे दूध चालत नाही. त्याला अनेक अन्नपदार्थांची अलर्जी आहे. आम्ही त्याला सांडणीचे दूध आणि मोजकं खायला देतो. जेव्हा लॉकडाउन सुरु झाले तेव्हा आमच्याकडे सांडणीच्या दुधाचा पुरेसा साठा नव्हता. राजस्थानमधील साद्री येथून मला हे सांडणीचे दूध किंवा त्याची पावडर मिळवून देण्यासाठी मदत करा, असे ट्विट मुंबईमधील या महिलेने केले होते. त्यात पंतपप्रधान नरेेंद्र मोदी यांनादेखील टॅग करण्यात आले होते. याची तात्काळ दखल घेत, भारतीय रेल्वे प्रशासनाने थेट राजस्तानमधून सांडणीचे २० लिटर दूध मुंबईत पोहचवले आहे.
मुंबईतील रेणू कुमारी या महिलेचे ट्विट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या ट्विटवर आपले आपले मत मांडले आणि सल्ले दिले. आयपीएस अधिकारी असणार्‍या बोथरा यांनाही हे ट्विट पाहिल्यावर अ‍ॅडव्हिक फूड्स या कंपनीशी संपर्क साधला. सांडणीचे दूध बनवणारी ही देशातील पहिली कंपनी आहे. या कंपनीने सांडणीच्या दुधाची पावडर देण्यास होकार दिला. मात्र ती मुंबईला कशी पोहचवणार हा मोठा प्रश्न होता. यासंर्भातील चक्र कशी हलली याबद्दल खुद्द जैन यांनीच पीटीआयला माहिती दिली. बोथरा यांचे ट्विट पाहिल्यावर आम्हाला या प्रकरणाबद्दल माहिती मिळाली. मी अजमेर येथील रेल्वेचे अधिकारी महेश चंदा जेवालीया यांच्याशी याबद्दल चर्चा केली. त्यानंतर आम्ही लुधियानाहून वांद्र्याला जाणार्‍या ट्रेन क्रमांक ०००९०२ च्या माध्यमातून हे काम करण्याचे ठरवले. यासाठी आम्ही ही ट्रेन राजस्थानमधील फालना रेल्वे स्थानकात थांबवण्याचे ठरवले. हा या ट्रेनचा अधिकृत थांबा नाही तरी आम्ही हा निर्णय फक्त हे पाकीट कलेक्ट करण्यासाठी घेतला. फालना येथून हे पाकिट ट्रेनमधील व्यक्तीकडे देण्यात आले त्यानंतर ते मुंबईतील महिलेपर्यंत पोहचवण्यात आलं, असं जैन यांनी सांगितलं. रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दुधाची पावडर पुरवणार्‍या कंपनीला नियोजनाची माहिती दिली आणि पावडरचे पाकीट फालना स्थानकामध्ये रेल्वेच्या व्यक्तीकडे देण्यासंदर्भात कळवले. संबंधित प्रकरणाची माहिती वरिष्ठांना देऊन त्यांच्याकडून ट्रेन थांबवण्याची परवानगी घेण्यात आली. नियोजित पद्धतीने हे दूध मुंबईतील गरजू महिलेपर्यंत पोहचवण्यात आले. याबद्दल बोथरा यांनी उत्तर-पश्चिम रेल्वेचे मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक (सीपीटीएम) असणार्‍या तरुण जैन यांचे आभार मानले आहेत.