साफसफाईचा मक्ता 48 तासात बंद करण्याचे संकेत

0

वॉटरग्रेस कंपनीने वकीलांमार्फेत मनपा प्रशासनाला दिली नोटीस


जळगाव: शहरातील साफससफाई आणि कचरा संकलनासाठी मनपा प्रशासनाने वॉटरग्रेस कंपनीला पाच वर्षासाठी एकमुस्त मक्ता दिला आहे.मात्र साफसफाईबाबत अनेक तक्रारी असल्यामुळे तसेच समाधानकारक साफसफाई होत नसल्याने मनपा प्रशासनाने मक्ता रद्द का करण्यात येवू नयेे अशा आशयाची मक्तेदाराला अंतिम नोटीस बजावली होती.त्यावर मक्तेदाराने खुलासा देखील दिला.दरम्यान,मनपा प्रशासनाने 2 कोटी 26 लाखांचा बेकायदेशीर दंड लावल्याचे कारण देत 48 तासात काम बंद करण्याबाबतची वॉटरग्रेस कंपनीने सी.के.लिगल अ‍ॅडव्होकेट अ‍ॅण्ड कन्सलटन्टच्या माध्यमातून नोटीस देवून संकेत दिले आहे. यावर प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

मनपाने शहरातील दैनंदिन साफसफाईसाठी वॉटरग्रेस कंपनीला पाच वर्षासाठी 75 कोटींचा एकमुस्त मक्ता दिला आहे. ऑगस्ट महिन्यापासून मक्तेदाराच्या माध्यमातून साफसफाई आणि कचरा संकलनाचे काम सुरु आहे. मात्र साफसफाई होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने मनपा प्रशासनाने वारंवार मक्तेदाराला नोटीसा दिल्या.तरीही कामकाजात सुधारणा होत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. तसेच मनपा पदाधिकार्‍यांसह काही नगरसेवकांनीही नाराजी व्यक्त करत साफसफाईचा एकमुस्त मक्ता रद्द करावा अशी मागणी केली होती. त्यामुळे प्रशासनाने मक्तेदाराला मक्ता रद्द का करण्यात येवू नयेे अशा आशयाची अंतिम नोटीस बजावून सात दिवसात खुलासा मागविला होता.मक्तेदाराने मनपा खुलासा सादर केला होता.मात्र आता मक्तेदारानेच 48 तासात काम बंद करण्याचे संकेत दिले आहे.

प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था

साफसफाईसाठी मक्ता दिलेल्या वॉटरग्रेस कंपनीच्या कामावर प्रशासनासह पदाधिकारी व नगरसेवक तसेच नागरिक देखील समाधानी नसल्यामुळे प्रशासनाने मक्ता रद्द का करण्यात येवू नयेे अशा आशयाची मक्तेदाराला अंतिम नोटीस बजावली होती. त्यानंतर पर्यायी व्यवस्था म्हणून प्रभाग समिती क्रमांक 2,3 व 4 साठी वेगवेगळे साफसफाईचा मक्ता देण्यासाठी निविदा काढली असून दि.28 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. प्रभाग समिती क्रमांक 1 मधील प्रभागांमध्ये मनपाच्या आरोग्य विभागातील कर्मचार्‍या तर प्रभाग समिती क्रमांक 2,3 व 4 मध्ये नवीन वेगवेगळ्या तीन मक्तेदारांच्या 400 कामगारांच्या माध्यमातून साफसफाईसाठीची प्रक्रिया सुरु आहे.