सामान्य जनतेच्या हृदयावर राज्य करणारे बाळासाहेब ठाकरे

0

रमा दत्तात्रय गर्गे (कोल्हापूर) मुलाखत घेणारा विचारत होता, बॉम्बस्फोट होतात! दंगली होतात! मग त्यामध्ये शिवसेनेचा हात असत नाही का? त्यावर मुलाखत देणारा म्हणतो, दंगलीत शिवसेनेचे हात नाही, तर पाय असतात! असे थेट उत्तर देणारा, सामान्य जनतेच्या हृदयावर राज्य करणारा हा कलंदर माणूस म्हणजे, बाळासाहेब ठाकरे होत. बाळासाहेब ठाकरे प्रबोधनकारांच्या घरात जन्माला आले. प्रबोधनकार ठाकरे इतिहास, नाट्य, पत्रकारिता, संपादन, समाजसुधारणा, संशोधन, पटकथालेखन अशा क्षेत्रात ठसा उमटवणारे आणि उत्कृष्ट वक्तृत्व असलेले भाषा कोविद होते, विचारवंत होते. मात्र त्यांचा हा मुलगा मनस्वी व्यंगचित्रकार निघाला. बाळासाहेबांची मोहिनी सर्वसामान्य माणसावर का पडली असेल? याचा मी अनेकदा विचार करते. त्या त्या वेळी मला एक गोष्ट लक्षात येते. माणसाचे मन नेहमी स्वतःशी बोलत असते वेगवेगळ्या प्रकारे आणि वागताना मात्र व्यवहाराला धरून, फायद्याचे वागत असते. तेच मन जर प्रकटपणे बोलू लागले तर? तेव्हा ती व्यक्ती आपला प्रतिनिधी वाटू लागेल. बाळसाहेब ठाकरे मनात येईल ते बोलू शकत. जे बोलत त्याची जबाबदारी ते घेत असत. मग ती वक्तव्ये दक्षिणेकडच्या लोकांसाठी असोत की उत्तरेकडच्या. मराठी माणसाला मनातल्या मनात हे कळत होते की दक्षिणेकडचे लोक शिक्षणाच्या जोरावर आणि यूपी, गुजराती हे लोक मेहनतीच्या जोरावर पुढे जात आहेत पण तरीही मनातल्या मनात वाटायचे की काय ही माणसे. आमच्याच राज्यात येऊन आम्हाला त्रास देतात. मग जेव्हा हीच गोष्ट लुंगी-पुंगी अशा भाषेत एखादे नेतृत्व बोलू लागते तेव्हा ते आपल्याच मनाचे पडसाद वाटतात. बाळासाहेबांनी मनुष्याची ही नस अचूक ओळखली होती म्हणूनच त्यांनी नामांतराला विरोध केला, मंडल आयोगाला विरोध केला, मुस्लिमांना विरोध केला तरी देखील त्यांच्या शिवसेनेत ओबीसी, दलित, मुस्लिम आदिवासी आदी शिवसैनिकांची भरपूर संख्या होती. कारण, त्या सैनिकांची बाळासाहेब ठाकरे बोलतात त्या वक्तव्याशी नव्हे तर बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बांधिलकी होती. वैचारिक बैठक, तात्विक मांडणी असे काही नाही. मनाचे मनाशी नाते!

या कलंदर माणसाला सुरुवातीला चिडवले गेले. तुमची शिवसेना ही ‘वसंत सेना’ आहे, असे म्हटले गेले. वसंतराव नाईकांच्या छत्रछायेखाली तुम्ही वाढत आहात, असे म्हटले गेले. तेव्हा प्रतिवाद नाहीच. चिडवणार्‍यांनी तोंडात बोटे घालावी असे काहीसे बाळासाहेबांनी करून दाखवले. वसंतराव नाईक करत तसाच पोशाख करून ते अनेक दिवस ते वावरले. आम्हाला राजकारण नाही तर समाजकारण करायचे आहे. त्याचे प्रमाण 80ः20 असे आहे, हे बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगत असत. जाहीरपणे त्यांनी ज्यांच्या ज्यांच्यावर टीका केली अशा सर्वांशी व्यक्तिगत आयुष्यात त्यांच्या अत्यंत प्रेमाचे सलोख्याचे संबंध होते. तेही लपून-छपून नाही. कुठलीच गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवून केली नाही. जे आहे ते ते मोकळेपणाने बोलत गेले. समर्थकांबरोबरच विरोधकांवरही त्यांनी प्रेम केले आणि हवे त्याला हवे तिथे हवे तसे बोलूनही घेतले. शिवसेना कधी मराठी बाण्यासाठी लढली, तर कधी हिंदुत्ववादासाठी लढली. भैया लोकांच्या गाड्या उलथवून टाकून शिव वडापाव स्थापित करण्याचा शिवसेनेने प्रयत्न केला. रस्त्यावर नमाज चालू असतील तर तेथे महाआरत्या केल्या. बाबरी ढाचा पाडल्यानंतर अभिमानाने त्याची जबाबदारी बाळासाहेबांनी घेतली. बॉम्बस्फोटानंतरच्या दंगलीविषयी अत्यंत भडक वक्तव्य करून देखील त्यांना हात लावण्याचे धाडस शासनाला झाले नाही. त्यांचे बॉलिवूडमध्ये, राजकारणात सगळीकडे संबंध होते आणि अगम्य परस्पर विरोधी वर्तन असूनही त्यांचे समर्थक त्यांना देव मानत होते. कोणत्या चौकटीत बसवायचे या मनुष्याला? खरेतर बाळासाहेब कसे होते हे शोधणे म्हणजे मानवी मनाचा शोध घेतल्यासारखे आहे. ते मानवी मनासारखे होते. भावभावना, विचार, संवेदनशीलता, निष्ठुरता, करुणा, दया, मैत्री, प्रेम, आस्था, आपुलकी… सर्वकाही भरभरून नांदणारे स्वच्छ पारदर्शक नितळ मन! या मनाला जशा कोणत्याही संविधानाच्या आणि घटनेच्या चौकटी रोखू शकत नाहीत तसेच बाळासाहेबांच्या मनाच्या प्रकट हुंकरालाही कोणतीही शक्ती रोखू शकली नाही. इतके ते स्वाभाविक होते. म्हणूनच त्यांची अंत्ययात्रा देखील अभूतपूर्व निघाली. आजही समर्थकांबरोबरच विरोधकही त्यांच्या आठवणीने गहिवरतात. यातच त्यांचे मोठेपण सामावलेले आहे.

बाळासाहेबांना खरे तर ही उपमा आवडली नसती परंतु तरीही ती देण्याचा मोह मला आवरत नाही. बाळासाहेब पाणीपुरी सारखे होते. एकाचवेळी तिखट, आंबट, गोड, खारट. पाण्यासारखे मृदु आणि पुरीच्या आवरणासारखे कठोर. खाताना चरचरीत आनंद मिळतो. गोड चव ही झणझणीत तिखटपणात मिसळून जाते. आंबट, खारट चव जिभेवर तृप्ती आणते आणि त्याचवेळी डोळ्यातून पाणीही येते.पण पुन:पुन्हा खावीही वाटते. अशी भैयाकडची पाणीपुरी म्हणजे बाळासाहेबांचे मन होते. व्यक्तित्व होते. बाळासाहेब म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे बाळासाहेब. 12 नोव्हेंबर 2012 रोजी, जेव्हा त्यांना हॉस्पिटलमधून घरी आणले तेव्हापासून महाराष्ट्रातल्या कानाकोपर्‍यातील माणूस सकाळ, संध्याकाळ बाळासाहेबांच्या तब्येतीची माहिती करून घेत होता. 17 नोव्हेंबर 2012 रोजी काळाने घाला घातला आणि हे प्रकटमन काळाच्या पडद्याआड गेले. पण मराठी माणूस जोवर आहे आणि जिथे आहे तोवर बाळासाहेबांची, त्यांच्या कलंदरपणाची, त्यांच्या दिलदारपणाची, त्यांच्या भडकपणाची, त्यांच्या सर्वसमावेशक स्वभावाची आठवण करतच राहणार यात शंकाच नाही.