सावरकर समजायला अनेक जन्म घ्यावे लागतील: विक्रम गोखले

0

पुणे: राज्यात स्वांतत्र्यवीर सावरकरांवरून वाद सुरु असून, जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी सावकरांवर टीका करणाऱ्यांना सुनावले आहे. सावरकर आणि आंबेडकर एकत्र आले असते तर आजचा भारत वेगळा दिसला असता. सावरकरांनी कधीही दुसऱ्या धर्माचा द्वेष केला नाही. त्यामुळे संपूर्ण खरे सावरकर समजायला अनेक जन्म घ्यावे लागतील असे म्हटले आहे. पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर वाङ्‍‍मय वक्तृत्व स्पर्धा समितीच्या वतीने विक्रम गोखले यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं.

सावरकरांचा विज्ञानवाद लोकांना पटत नाही. गाय हा पशू आहे, असं सावरकरांनी सांगितल्याने स्वत:ला हिंदू म्हणवणारा माणूस सावरकर यांच्यापासून दूर जातो ही दुर्दैवाची गोष्ट आहे. स्वत:ला स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी, सावरकरभक्त म्हणणे सोपे आहे. पण असे म्हणणाऱ्यांनी सावरकरांच्या विचारांवर प्रेम केले पाहिजे, हा माझा आग्रह आहे. देशाला सावकरांचे विचारच वाचवू शकतात. हिंदू आणि हिंदुत्त्वाची व्याख्या सावकरांकडून मिळते. सावरकरांच्या विचारांशिवाय खरा हिंदुत्ववाद समजणार नाही असं विक्रम गोखले यांनी सांगितलं आहे.

प्रत्येकाकडून काही ना काही चुका होत असतात. सावरकरांकडूनही काही चुका झाल्या असतील तर त्यांच्या स्विकार केला पाहिजे. पण कुणीही उठतो आणि लोकशाहीच्या नावाखाली सावरकरांवर टीका करतो हे फार चुकीचं आहे, असं मत विक्रम गोखले यांनी व्यक्त केलं. तसेच हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे असे आवाहन केलं. हिंदू समाज कधीही एकत्र येत नाही, हा इतिहास आहे.