सुप्रिम कॉलनीतील खुबा नगरात अग्नीतांडव; 14 घरांचा कोळसा

0 1

जळगाव । सुप्रिम कॉलनी परीसरातील खुबा नगरात असलेल्या व्यायामशाळेजवळ भल्या पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीत 14 पार्टेशनची घरे जळून खाक झाल्याची घटना घडली असून या आगीत संसारोपयोगी वस्तूंसह रोकड रक्कम जळून खाक झाले आहे. या मात्र तब्बल दीड तासानंतर नगरपालिकेचा अग्नीशमन दलाचे बंब पोहचल्यानंतर आग विझविण्यात यश आले. या घटनेत मात्र कोणतीही जिवीतहानी झाली नाही परंतू मिनाबाई रमेश कोळी व प्रविण श्रावण पाटील हे दोघे किरकोळ भाजले गेले आहे. आगीत सुमारे 15 ते 20 लाखांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

सुप्रिम कॉलनीजवळील खुबा नगरातील मासे बाजार, व्यायामशाळेजवळ असलेल्या 14 पार्टेशनची घरे असून यात शकुर नवाज पटेल यांच्या मालकीचे आठ घरे आहेत तर नाशिर खाटीक यांची 6 घरे यांच्या मालकिची आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही घरे भाडेतत्वावर दिली आहेत. शुक्रवारी पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास अचानक बकर्‍यांचा ओरडण्याचा आवाज आल्यानंतर आरिफाबी पटेल यांना जाग आली. जाग आल्यानंतर घराच्या बाहेर येवून बघितले असता त्यांना घरांना आग लागल्याचे दिसून आले. आग लागल्याची आरडाओरड केल्यानंतर पार्टेशनच्या घरातील रहिवाश्यांनी जीव वाचवत घराबाहेर पडले. दरम्यान आग एवढी भीषण होती की पार्टेशनच्या घरांसह संसारोपयोगी वस्तू पुर्णपणे जळून खाक झाल्या आहेत.