सुरक्षा रक्षकांनी ५ दहशतवाद्यांचा केला खात्मा

0

श्रीनगर-जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यातील किलुरा या ठिकाणी पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले आहे. सुरक्षा दलाने सुरू केलेल्या ‘ऑलआऊट’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. ठार झालेले दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे आहेत असेही सुरक्षा दलांनी स्पष्ट केले आहे. मागील ७२ तासांमध्ये ९ अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे.

किलुरा भागात दहशतवादी लपून बसले आहेत अशी माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. त्यानंतर या भागांमध्ये शोध मोहिम राबवण्यात आली. या शोध मोहिमेबाबत दहशतवाद्यांना समजताच त्यांच्याकडूनही गोळीबार सुरू झाला. या गोळीबाराला उत्तर देताना सुरक्षा दलांनी पाच दहशतवाद्यांना ठार केले. अद्यापही किलुरा या ठिकाणी दहशतवादी आणि जवानांदरम्यान चकमक सुरूच आहे असेही समजते आहे. किलुरामध्ये ठार करण्यात आलेल्या पाचपैकी एका दहशतवाद्याचे नाव उमर मलिक असे आहे. त्याच्याकडे असलेली एके ४७ रायफलही जप्त करण्यात आली आहे. उमर मलिक हा लष्कर ए तोयबाचा दहशतवादी असल्याचेही समोर आले आहे