सेनेने भाजपला अंधारात ठेवले नाही; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर खडसेंची प्रतिक्रिया !

0

उस्मानाबाद : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. शिवसेनेने भाजपसोबत निवडणूक लढविल्यानंतर भाजपपासून फारकत घेत कॉंग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. यावर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेकडून 2014 मध्येही काँग्रेसला सत्तास्थापनेचा प्रस्ताव आला होता असा गौप्यस्फोट केला. यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते शिवसेनेकडे उत्तर मागत आहेत. मात्र भाजप ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 2014 मध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले होते. त्यामुळे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य त्यावेळी शिवसेनेला होते. शिवसेनेने भाजपला अंधारात ठेवण्याचा प्रश्नच नाही, असे एकनाथ खडसे म्हणाले.
अक्कलकोट स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर, एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

2014 ची निवडणूक भाजपने एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्त्वाखाली लढली होती. 2014 मध्ये भाजप-शिवसेना स्वतंत्र लढले होते, युती नव्हती. एकट्याच्या बळावर त्यावेळी भाजपने निवडणुका लढवल्या होत्या. स्वाभाविकपणे भाजपचे एकट्याच्या जीवावर सरकार होत असल्याचे दिसल्यानंतर अन्य पक्षांनी एकत्र येण्याची प्रक्रिया केली असावी. आज एकमेकांच्या विरोधात तत्व आणि विचार असताना भाजपविरोधात सत्ता स्थापन झाली. कदाचित तसा विचार 2014 मध्येही झाला असावा. त्यामुळेच प्रयत्न झालेच असतील. शिवसेनेने भाजपला अंधारात ठेवण्याचा प्रश्नच नाही कारण दोन्ही पक्ष 2014 मध्ये वेगळे लढले होते. त्यामुळे वेगळे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य शिवसेनेला होते. 2019 मध्ये आम्ही एकत्र लढूनही टोकाचे मतभेद झाल्या, त्यामुळे आजचं सरकार स्थापन झाले आहे, भाजपचं सरकार स्थापन झाले नाही असे खडसेंनी सांगितले.