सेन्ट्रल फुले मार्केटमधील १७ गाळे सील

0

बड्यांना अभय,छोट्या व्यावसायिकांवर कारवाई : मनपाकडून दुजाभाव

जळगाव– मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या सेन्ट्रल फुले मार्केटमधील 17 गाळे सील करण्याची कारवाई मनपा प्रशासनाने केली. तिसर्‍या मजल्यावरील काही बंद असलेले गाळे तर दुसर्‍या मजल्यावरील छोट्या व्यवयायिकांचे गाळे सील करण्यात आले आहे.त्यामुळे बड्यांना अभय आणि छोट्या व्यावसायिकांवर कारवाई असा मनपाकडून दुजाभाव होत असल्याचा आरोप होत होता.यावेळी पोलीस बंदोबस्त होता.

महापालिकेच्या मुदत संपलेल्या फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील साडेनऊशे गाळेधारकांना 81 क’ च्या नोटीसा बजावून 11 ऑक्टोंबर पर्यंत थकीत रक्कम भरण्याची मुदत दिली होती. मुदत वाढून सुध्दा अनेक गाळेधारकांनी थकीत रकमेचा भरणा केला नाही अशा गाळेधारकांची प्रशासानाने यादी तयार करून यापूर्वी फुले मार्केटमधील 26 गाळे सील केले होते. त्यानंतर गुरुवारी सेंट्रल फुले मार्केटमधील 17 गाळे सील केले.यावेळी उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुटे यांच्यासह अतिक्रमण व किरकोळ वसुली विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. तिसर्‍या मजल्यावरील काही बंद असलेले गाळे तर दुसर्‍या मजल्यावरील छोट्या व्यवयायिकांचे गाळे सील करण्यात आले आहे.त्यामुळे मनपा दुजाभाव करीत असल्याचा काही गाळेधारकांनी आरोप केला.

पोलिसांचा बंदोबस्तात कारवाई

सेन्ट्रल फुले मार्केटमधील गाळे सील करण्याच्या कारवाईदरम्यान अनुचित प्रकार घडू नये,कायदा व सुव्यव्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता. गुरुवारी करण्यात आलेल्या कारवाईमुळे गाळेधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.