स्कायवॉकसाठी रेल्वे,मनपाचेे अधिकारी करणार प्रत्यक्ष पाहणी

0

भोईटेनगर रेल्वे उड्डाणपुलावरून आर्म ऐवजी समांतर बोगद्याच्या पर्यायावर बैठकीत चर्चा

जळगाव– शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरु असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते.त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून भोईटेनगर उड्डाणपुलावरील आर्म, तहसिलकडून शिवाजी नगरवासीयांसाठी स्कायवॉक व ब्राह्मण सभेजवळ अंडरपास करण्याचा प्रस्ताव रेल्वे विभागाकडे देण्यात आला होता.त्यानुसार रेल्वे आणि मनपा अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.तसेच यासंदर्भात रेल्वे विभागाकडून डिझाईन व अंदाजपत्रक मनपाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा यांनी दिली.
रेल्वे विभागाशी संबंधित कामांबाबत खासदार उन्मेष पाटील यांच्या पुढाकाराने अधिकार्‍यांची बैठक झाली. बैठकीला स्थायी समिती सभापती अ‍ॅड. शुचिता हाडा, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, मयुर कापसे, अ‍ॅड. दिलीप पोकळे , नगरसेविका सरीता नेरकर, प्रतिभा देशमुख , शहर अभियंता सुनील भोळे, प्रकल्प अभियंता योगेश बोरोले उपस्थित होते. बैठकीत रेल्वे प्रशासनाने भोईटेनगर रेल्वे उड्डाणपुलावरून आर्म ऐवजी समांतर बोगद्याचा दिलेल्या पर्यायावर चर्चा करण्यात आली. आर्म संदर्भात रेल्वे प्रशासनाने तीन ते चार प्रस्ताव तयार केले आहेत.

स्कायवॉकसाठी रेल्वेविभाग सकारात्मक

शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरु असल्यामुळे नागरिकांना शहरात येण्या-जाण्यासाठी गैरसोय होते.जीव मुठीत घालून रेल्वे रुळ ओलांडताना सध्याचे चित्र पाहायला मिळत आहे.त्यामुळे तहसील कार्यालयाजवळील देवकर निवासजवळ स्कॉयवॉकचा पर्याय मनपाच्या पदाधिकार्‍यांनी दिला.या पर्यायाला रेल्वे विभागाने सकारात्मकता दर्शविली आहे. त्यासाठी अंदाजपत्रक आणि डिझाईन तयार करण्यात येणार असून खासदार आणि आमदार निधीतून खर्च उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

शनिवारी करणार पाहणी

भोईटेनगर उड्डाणपुलावरून पिंप्राळ्याकडे जाण्यासाठी आर्मची गरज असल्याची बाजू मांडण्यात आली. आर्म झाल्यास भुयारी मार्गाची गरज भासणार नाही. त्यामुळे भुयारी मार्गावर होणारा खर्च आर्मसाठी करता येणे शक्य होणार आहे. तसेच ब्राह्मण सभेजवळ अंडरपासच्या कामाचीही मागणी असल्याने येत्या शनिवारी रेल्वे प्रशासन व पालिकेच्या अधिकार्‍यांमार्फत संयुक्त पाहणी करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष पाहणीनंतर निर्णय घेण्यात येणार आहे.