स्थलांतरित आदिवासी मजूरांची गुजरातला राहण्यासह अन्नाची व्यवस्था

0

नंदुरबार। जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील स्थलांतरित मजूर हे अहमदाबाद, बारडोली, सुरत, जुनागड जिल्ह्यात मिरची तोडण्यासाठी, खाजगी गुळाच्या गुऱ्हाळांवर व साखर कारखान्यात काम करण्यासाठी गेले होते. अशा बाराशे ते तेराशेच्या आसपास काम करणारे मजूर आहेत. हे मजूर ज्याठिकाणी कामासाठी होते त्या मालकांनी त्यांना अन्न व निवारा देण्यासाठी नकार दिला होता.

यासंदर्भात लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी ६ एप्रिल रोजी उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडे गुजरात सरकारच्यावतीने या मजुरांची राहण्याची आणि अन्नाची व्यवस्था करण्याबाबत विनंती केली होती. यासंदर्भात ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी श्रीमती शिंदे यांचे निवेदन मिळताच गुजरात राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना निवेदन दिले. तसेच स्थानिक पातळीच्या संबंधित अधिकारी यांच्याशी उपसभापती कार्यालयातील अधिकारी यांनी फोनद्वारे चर्चा करून त्यांना व्यवस्था करण्याची विनंती केली.

याच दरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तात्काळ दखल घेण्याची विनंती ना.डॉ.गोऱ्हे यांनी केली होती. उपसभापती कार्यालयातील अधिकारी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री यांचे सचिव तसेच अहमदाबाद, बारडोली, सुरत, जुनागड येथील जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांना या मजुरांना मदत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते.

यात ६ एप्रिल रोजी सायं ०५ वाजता उपसभापती ना.डॉ.गोऱ्हे आणि उपसभापती कार्यालयातील अधिकारी यांच्या प्रयत्नांना यश आले. सायंकाळी या मजुरांच्या राहण्याची तसेच अन्नाची व्यवस्था गुजरात प्रशासनाने केली. याबाबत आदिवासी मजुरांनी व लोक संघर्ष मोर्चाच्या सदस्यांनी ना.डॉ.गोऱ्हे यांचे आभार मानले. तसेच लोकडाऊन संपल्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या सीमेपर्यंत गुजरात सरकारच्यावतीने त्यांना पोहोचविले जाणार आहे.