स्थलांतर करणार्‍या मजूरांना शिवसह्याद्री प्रतिष्ठानचा मदतीचा हात

0

जळगाव – परप्रांतिय कामगारांनी घाबरून स्थलांतर करू नये आहे तिथेच थांबावे त्यांची भूक भागविण्याची जबाबदारी आता नशिराबाद येथील शिवसहयाद्री प्रतिष्ठानने घेतली आहे. या प्रतिष्ठानमार्फत महामार्गाने पायपीट करीत स्थलांतर करणार्‍या परप्रांतातील मजूर, कामगारांना भेटतील त्याठिकाणी जेवणाचा डबा देण्याचे काम केले जात आहे. गेल्या अकरा दिवसांपासून शिवसह्याद्री प्रतिष्ठानने ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

लॉकडाऊनमुळे राज्यातील मजूर, कामगार हा हजारो मैल पायपीट करून आपल्या गावी निघाला आहे. वाटेत मिळेल ते खाऊन प्रवास करायचा अशी त्यांची अवस्था आहे. मात्र नशिराबाद येथील शिवसहयाद्री प्रतिष्ठानने अशा स्थलांतर करणार्‍या मजूर, कामगारांना मदतीचा हात दिला आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश चव्हाण आणि सहकारी जळगाव-भुसावळ महामार्गावरून स्थलांतर करणार्‍या परप्रांतिय कामगारांना जेवण देत आहे. याबाबत बोलतांना शिवसहयाद्रि प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश चव्हाण यांनी सांगितले की, महामार्गाद्वारे स्थलांतर करणार्‍या परप्रांतियासाठी जेवण देत छोटया स्वरूपात सुरू झालेल्या या कार्याने आता व्यापक स्वरूप घेतले आहे. शिवसह्याद्री प्रतिष्ठानअंतर्गत गावातील अनेक तरूण या कार्यासाठी पुढे आल्याने समाधान वाटत असल्याचे दीपक चव्हाण यांनी सांगितले. आतापर्यंत अनेक परप्रांतीयांना भेटतील त्या ठिकाणी जेवणाचा डबा देण्याचे काम सुरूच आहे.