स्थायी सभापतीपदाचा पेच कायम !

0

शीतल शिंदे की विलास मडिगेरी ; 7 मार्चला होणार फैसला

एकाच पक्षाच्या दोन्ही आमदारांकडून वेगवेगळी खेळी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाचा वाद चांगलाच रंगू लागला आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार शीतल शिंदे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन ’मला मागील वर्षी स्थायी सभापतीपद देण्याचे कबूल केले होते. तसेच स्थायीचे सदस्यत्व प्रत्येक सभासदाला एक वर्षाकरिता देण्याचा निर्णय पक्षाच्या कोअर कमिटीत झाला होता’ मात्र ठरल्याप्रमाणे सभापतीपद मिळत नसल्याचे आरोप करत माझ्यावरील अन्याय दूर करावा अशी मागणी कोअर कमिटीकडे आहे असे सांगितले. शिंदे यांनी आपल्यावर अन्याय झाला अशी कैफ़ियत पत्रकार परिषदेतून मांडून सभापतीपदावर हक्क सांगितला आहे. शीतल शिंदे आणि विलास मडिगेरी या दोघांपैकी कोणाची वर्णी लागते हे 7 मार्चला दिसून येणार आहे.

जगतापांच्या भूमिकेकडे लक्ष
रविवारी शिंदे यांनी आमदार महेश लांडगे यांची भेट घेतली. पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांवर वारंवार अन्याय होत आहे. कोअर कमिटीने घेतलेला निर्णय योग्य आहे का? हे विचारण्यासाठी तसेच आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी आपण आमदार महेश लांडगे यांची भेट घेतली असे नगरसेवक शीतल शिंदे यांनी म्हटले. मात्र, भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपले म्हणणे मांडल्याचे शीतल शिंदे यांनी सांगितलेले नाही. त्यामुळे शिंदे आणि आमदार जगताप यांच्यात संवाद नाही का? असा प्रश्‍न निर्माण झाला असून तोच या समस्येचे खरे कारण आहे की काय असाही प्रश्‍न यामुळे निर्माण होत आहे.

वर्चस्वासाठी स्पर्धा
पिंपरी चिंचवड भाजपमध्ये गटतट नाहीत असे वरकरणी सांगितले जात असले तरी त्यात तथ्य नाही आमदार जगताप आणि आमदार लांडगे यांना मानणारे नगरसेवक, कार्यकर्त्यांचे गट शहर आणि पालिकेच्या राजकारणात सक्रीय आहेत त्यातच मूळच्या भाजप कार्यकर्त्यांचा दुर्लक्षित, उपेक्षित आणि महत्वाच्या पदांच्या प्रतिक्षेत असलेला एक गटही आहे. शितल शिंदे आणि सध्या ज्यांचे नाव स्थायीसभापतीपदासाठी पक्षाच्या नेत्यांनी निश्‍चित केले आहे ते विलास मडिगेरी हे देखिल त्याच उपेक्षित गटाचे आहेत. मात्र, लांडगे आणि जगताप गटांच्या वर्चस्वाच्या स्पर्धेत या दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

दिलेला शब्द पाळावा
दिलेला शब्द पाळण्याची भाजपची परंपरा सध्या या शहरातील भाजपमध्ये पाळली जात नाही. शिंदे यांनी पत्रकार परिषदेत काही प्रश्‍न उपस्थित केले. त्या प्रश्‍नाचे उत्तर आमदार जगताप यांचे नाव न घेता त्यांच्याकडून मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्या अर्थाने हे आमदार जगताप यांच्या पक्षातील वर्चस्वाला एक प्रकारे आव्हान आहे. आता आमदार जगताप हा पेच कसा सोडवतात त्यावर सारे अवलंबून आहे. शिंदे यांची बंडाळी मोडून काढून विलास मडिगेरी यांनाच स्थायीसमिती सभापतीपदी बसविण्यात आमदार जगताप यशस्वी झाले तर ते त्यांच्यासाठी मोठेच यश ठरणार आहे. मात्र, या प्रकरणात आमदार लांडगे यांची भूमिकाही तितकीच महत्वाची असणार आहे.