स्थायी समिती अध्यक्षपदी सुनील कांबळे यांची बिनविरोध निवड 

0 1
पुणे :  पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपकडून सुनील कांबळे यांची आज झालेल्या निवडणुकी दरम्यान बिनविरोध निवड झाली.   यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक, मावळते स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, शिवसेना गटनेते संजय भोसले तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपकडून नगरसेवक सुनील कांबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगरसेविका स्मिता कोंढरे यांना संधी देण्यात आली होती. तर स्थायी समितीमध्ये सत्ताधारी भाजपचे सर्वाधिक सदस्य असल्याने सुनील कांबळे यांचा विजय निश्चित मानले जात होता. मात्र आज निवडणूकीच्या दरम्यान राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाकडून स्थायी समिती अध्यक्ष पदाची निवडणूक लढविणाऱ्या नगरसेविका स्मिता कोंढरे यांनी पक्ष आदेशानुसार अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपचे सुनील कांबळे यांची स्थायी समिती अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली. त्यामुळे सुनील कांबळे यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजून आणि गुलाल उधळून एकच जल्लोष केला.
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की, स्थायी समिती अध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्याशी आज सकाळी फोनवरून चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी ही निवडणूक बिनविरोध होईल असे सांगितल्यानंतर बिनविरोध झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सुनील कांबळे यांच्या माध्यमातुन शहराच्या हिताचे निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  या निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष सुनील कांबळे म्हणाले की, स्थायी समिती अध्यक्ष पदाच्या माध्यमातुन येत्या काळात सर्व सामान्यांना केंद्र बिंदू मानून निर्णय घेतले जातील. तसेच शहराच्या विकास कामांना गती दिली जाईल. अशी भावना त्यांनी व्यक्त केली.