स्वच्छ सर्वेक्षण सल्लागारांना पालिकेनी दिली नोटीस

0

मानांकन घसरल्याने मागितला खुलासा

पुणे : स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत नुकत्याच जाहीर झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2019 स्पर्धेत देशातील स्वच्छ शहरात महापालिकेचा क्रमांक 10 वरून थेट 37 वर गेला आहे. या सर्वेक्षणासाठी 2 सल्लागार नेमूनही महापालिकेचे मानांकन घसरल्याने पालिकेकडून या दोन्ही सल्लागारांना खुलासा करण्याची नोटीस बजाविण्यात आली असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली. या सर्वेक्षणात महापालिकेकडून स्पर्धेसाठी करण्यात येणार्‍या सादरीकरणात पालिकेचे गुण कमी झाले आहेत. त्याची गंभीर दखल घेत ही नोटीस दिली आहे.

महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसाठी यावर्षी मोठ्या प्रमाणात तयारी केली होती. त्या अंतर्गत पालिकेने 2 स्वतंत्र सल्लागार नेमले होते. त्यात ई ऍन्ड वाय या कंपनीसह केपीएमजी या कंपनीची नेमणूक केली होती. त्यातील पहिली सल्लागार कंपनी संपूर्ण अभियानासाठी तर केपीएमजी ही कंपनी शेवटच्या तीन महिन्यांत स्वच्छ सर्वेक्षणांच्या कागदपत्रांची पूर्तता, वेगवेगळ्या उपाययोजना तसेच सादरीकरणासाठी नेमण्यात आली होती. या कंपनीची नेमणूक करताना, राज्यातील नवी मुंबईसह दहा ते 12 प्रमुख शहरांनी हीच सल्लागार कंपनी नेमण्यात आली असल्याने त्याचा महापालिकेस फायदा होईल असे सांगण्यात येत होते. मात्र, 2 सल्लागार असूनही पालिकेचे मागील वर्षी 10 वे स्वच्छ शहराचे असलेले स्थान थेट 37 वर गेले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनास मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे या प्रशासनाने सर्वेक्षणात नेमकी चूक काय झाली याची कारणमिमांसा शोधण्यासाठी या दोन्ही कंपन्यांना नोटीस बजाविली आहे. त्यातील एका कंपनीने खुलासा केला आहे.