हल्ला करणार्‍यांना मोठी किंमत चुकवावी लागेल – नरेंद्र मोदी

0

नवी दिल्ली – पुलवामा येथे दहशतवादी हल्ला करणार्‍यांनी खूप मोठी चूक केली असून त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिला. एकाही दहशतवाद्याला सोडले जाणार नाही असे स्पष्ट करत सैन्य दलाला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात पाकिस्तानचे नाव न घेता इशारा दिला आहे. दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांनी खूप मोठी चूक केली आहे. त्यांना खूप मोठी किंमत चुकवावी लागेल. हल्ल्यामागे जी ताकद आहे, जे गुन्हेगार आहेत त्यांना नक्की शिक्षा मिळेल. आज प्रत्येक भारतीय शहीदांच्या कुटुंबीयांसोबत आहे. देशात आक्रोश आहे, लोकांचा रक्त उसळत आहे हे मला कळत आहे. काहीतरी केले पाहिजे ही भावना स्वाभाविक आहे. लष्कराच्या शौर्यावर आम्हाला पूर्ण विश्वास असून योग्य माहिती सुरक्षा यंत्रणापर्यंत पोहोचवावी जेणेकरुन दहशतवादाविरोधातील लढाई अजून तीव्र करता येईल असे नरेंद्र मोदींनी सांगितले.