हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवाच; मुक्ताईनगरात मुख्यमंत्र्यांचे भाजपला थेट आव्हान !

0

जळगाव: मुक्ताईनगर येथे महाविकास आघाडीचा जिल्ह्यातील पहिलाच मेळावा होत आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे प्रथमच जिल्ह्यात एकत्र आले आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. भाजपकडून दररोज हे सरकार टिकणार नाही असे वारंवार सांगितले जात आहे. ‘तुमच्यात हिम्मत असेल तर हे सरकार पाडून दाखवाच असे थेट आव्हान भाजपला दिले आहे.

आम्ही एकत्र आहोत, मजबूत आहोत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. भाजपकडून एप्रिलनंतर ऑपरेशन लोटस राबविणार असल्याचे सांगितले जात आहे. ‘तुम्ही काय ऑपरेशन लोटस राबविणार, तुम्हाला जनतेने लोटले, पुन्हा हिंमत केली तर पुन्हा लोटू’ असा हल्लाबोल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

मुक्ताईनगरमधील भाजप उमेदवाराला पराभूत करून जनतेने मुक्ताईनगरला मुक्त केले असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी माजी मंत्री खडसे यांचे नाव न घेता लगावला.