हेल्मेट न वापरणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांकडून 4 लाखांचा दंड वसूल!

0

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालयात मोहीम; 781 कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगा

जळगाव: वाढत्या अपघातांची संख्या चिंताजनक बाब आहे. या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्या बैठकीत हेल्मेट वापराबाबत निर्णय झाला होता. नागरिकांपासून नव्हे तर आधी आपल्या कार्यालय तसेच कर्मचार्‍यांपासून जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नियमांच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली होती. गेल्या दोन महिन्यात हेल्मेट न वापरणार्‍या जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील कर्मचार्‍यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले आहे. दोन महिन्यात 781 कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात येवून 3 लाख 90 हजाराचा दंड वसूल करण्यात येणार आहे. कर्मचारी, शासकीय कार्यालयांपासून सुरुवात झालेल्या मोहिमेला आता नागरिकांनाही सामोरे जावे लागणार असून शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी हेल्मेट वापराच्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन करण्यात आले आइे.

कर्मचार्‍यांपासून मोहिमेला सुरुवात

शहरासह जिल्ह्यातील वाढते अपघात चितेंची बाब बनली आहे. हे अपघात नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक त्या सर्वोतोपरी पावले उचलली जावीत, या अनुषंगाने नुकतीच जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पोलीस अधीक्षक, महामार्ग विभाग, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, शहर वाहतूक शाखा यांची संयुक्तीक बैठक पार पडली होती. शासकीय हेल्मेट वापरासंबंधींचा अध्यादेश असतांनाही त्याच्याकडून हेल्मेट वापराच्या नियमांना तिलांजली देण्यात येत असल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे कुठल्याही विभागाकडून या नियमांची अंमलबजावणी अथवा कारवाईही केली जात नव्हती. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाची चांगलीच झाडाझडती घेतली होती.

कर्मचार्‍यांपासून मोहिमेला सुरुवात

या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी आधीच आपल्या हेल्मेट सक्ती मोहिमेचा कर्मचार्‍यांपासून सुरुवात तसेच आपल्या कार्यालयापासून सुरुवात करा, असे आदेश दिले होते. कर्मचार्‍यांना शिस्त लागली की, यानंतर शहरासह जिल्ह्यात या मोहिम राबविण्याचा निर्णय बैठकीत झाला होता. त्यानुसार शहर वाहतूक शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय याठिकाणी मोहिम राबविण्यात आली. कार्यालयात ये-जा कर्मचार्‍यांची तपासणी करण्यात आली.

शासकीय कर्मचार्‍यांपाठोपाठ नागरिकांनाही लावली शिस्त

या दोन्ही कार्यालयांमध्ये जानेवारी महिन्यात 130 तर फेब्रुवारी महिन्यात 651 असे एकूण दोन महिन्यात 781 शासकीय कर्मचार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यातून प्रत्येक 500 रुपये याप्रमाणे 3 लाख 90 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आता शहरातही पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेतर्फे हेल्मेट न वापरणार्‍या नागरिकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरिक्षक देविदास कुनगर यांनी दिली.