होश मे आओ, मोदी सरकार होश मे आओ’

0 3

लोकसंघर्ष मोर्चाच्या नेतृत्वाखाली बेरोजगारांचा भुसावळ ते जळगाव पायी मोर्चा

जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चाचे सभेत रूपांतर
जळगाव – ‘होश मे आओ, होश मे आओ, मोदी सरकार होश मे आओ’ अशा घोषणा देत जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगारांनी आज लोकसंघर्ष मोर्चाच्या नेतृत्वाखाली भुसावळ ते जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी मोर्चामध्ये सुशिक्षीत बेरोजगारांसह युवतींचा देखिल आंदोलनात सहभाग होता.
रेल्वे, महापारेषण, महाजनको, ऑर्डनन्स फॅक्टरी, एस.टी.महामंडळ याठिकाणी अ‍ॅप्रेंटीस झालेल्या बेरोजगार तरूणांना तात्काळ सरळ सेवेत कायम करून त्यांना न्याय द्यावा यासह विविध मागण्यांसाठी आज लोकसंघर्ष मोर्चातर्फे भुसावळ येथून पायी मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा साकेगाव, नशिराबाद मार्गे जळगावात पोहोचला. शहरातील नेरीनाका चौक, बेंडाळे चौक, चित्राचौक, कोर्ट चौक, नविन बसस्थानक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला.
मोर्चाचे सभेत रूपांतर
सुशिक्षीत बेरोजगारांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर याठिकाणी सभेत रूपांतर झाले. यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतीभा शिंदे यांनी सुशिक्षीत बेरोजगारांना मार्गदर्शन केले. प्रतीभा शिंदे यांनी सांगितले की, देशातील राजकारणी हे तरूणांची दिशाभूल करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा हे एसी मध्ये बसुन तरूणांना रोजगाराचे सल्ले देतात पण रोजगार देत नाही अशी टिकाही त्यांनी केली. येणार्‍या निवडणूकांमध्ये फसव्या सरकारला खाली खेचण्याचे आवाहनही करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पाटील, विनोद देशमुख, सचिन धांडे, चंद्रकांत चौधरी, भरत परदेशी, योगीता भोई, धाव ठाकूर, मुकूंद सपकाळे, आदींसह तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशा आहेत मागण्या
ऑल इंडिया रेल्वे अ‍ॅप्रेंटीस प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना रेल्वेमध्ये भरती करा व 20 टक्के वाटा त्वरीत रद्द करा, महानिर्मीती, महावितरण, महापारेषण, ऑर्डनन्स फॅक्टरी, महाराष्ट्र एस.टी.महामंडळ येथील विद्यार्थ्यांना कायम स्वरूपात नोकरी देण्यात यावी, ज्या क्षेत्रामध्ये तरूणांना प्रशिक्षीत केले गेले त्या क्षेत्रातील काम न मिळाल्यामुळे सुशिक्षीत बेरोजगार तरूणांना दरमहा पाच हजार रूपये बेरोजगारी भत्ता सुरू करावा, सर्व रिक्त शासकीय जागा त्वरीत भरणा करून त्यात कंत्राटी व अनुभवी उमेदवारांना प्राधान्य मिळावे, विनाअट व विनाकारण मुद्रा लोन सुशिक्षीत बेरोजगारांना तात्काळ देण्यात यावे, जिल्ह्यात किती जणांना असे कर्ज वाटप झाले याची माहिती द्यावी, स्किल इंडिया योजनेंतर्गत प्रशिक्षण दिलेल्या किती विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेयाचा हिशेब द्यावा व रोजगार उपलब्ध करून द्यावा अशा मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले.