१६ हजार २२९ किमीच्या रस्त्यांसाठी ९ हजार ७७६ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता!

0
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे उद्द‍िष्ट निर्धारित वेळेत पूर्ण करा – पंकजा मुंडे
कामे झालेल्या ९६.३३ टक्के रस्त्यांचा दर्जा चांगला
मुंबई : गावखेड्यांना दर्जेदार रस्त्यांनी जोडण्याच्या उद्देशाने राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी निश्चित करण्यात आलेल्या उद्द‍िष्टांची वेळेत पूर्तता करण्यात यावी. सध्या पावसाळ्यात योजनेसंदर्भातील प्रशासकीय कामे पूर्ण करुन त्यानंतर रस्त्यांची प्रत्यक्ष बांधकामे अधिक गतीने पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विविध जिल्ह्यांच्या कार्यकारी अभियंत्यांना दिल्या. या योजनेसंदर्भात सद्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस संबंधीत जिल्ह्यांचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
५ हजार ८०४ किमी लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण
या योजनेतून ७ हजार ६०० किमी लांबीच्या कामापैकी आतापर्यंत साधारण ५ हजार ८०४ किमी लांबीची कामे पूर्ण झाली असून १ हजार ७९४ किमी लांबीची कामे प्रगतीपथावर आहेत. योजनेसाठी आतापर्यंत ६ हजार ६८६ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. तसेच रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेबाबत खासगी संस्थेकडून परिक्षण केले असता ९६.३३ टक्के रस्त्यांचा दर्जा चांगला असल्याचे निदर्शनास आले आहे. उर्वरीत २.६७ टक्के रस्त्यांची सुधारणा करण्याच्या सूचना ठेकेदारांना देण्यात आल्या असल्याची माहिती संबंधीत अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. याबाबत मंत्री पंकजा मुंडे यांनी समाधान व्यक्त केले.
१६ हजार २२९ किमी लांबीच्या रस्त्यांसाठी ९ हजार ७७६ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता
योजनेतून आतापर्यंत ३ हजार २२१ इतकी कामे मंजूर करण्यात आली आहेत. यातून ग्रामीण भागात १६ हजार २२९ किमी इतक्या लांबीच्या रस्त्यांची निर्मिती किंवा दर्जोन्नती होणार आहे. यासाठी ९ हजार ७७६ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे. आतापर्यंत झालेली कामे चांगली असून अनेक गावांना रस्ते मिळाले आहेत. यापुढील काळातही योजनेला अधिक गती देणे आवश्यक आहे. कार्यकारी अभियंत्यांनी त्यादृष्टीने कामाचे नियोजन करावे. पावसाळ्यात प्रशासकीय मान्यता,निविदा प्रक्रिया आदी कामे करण्यात यावीत, त्यानंतर रस्त्यांच्या प्रत्यक्ष बांधकामाला गती देण्यात यावी, अशा सूचना मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी दिल्या.
रस्ते सुरक्षेच्या उपाययोजना करा
या रस्त्यांच्या कामांमध्ये टाकाऊ प्लॅस्टीकचा वापर करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे, अपघात विरहीत होण्याच्या दृष्टीने रस्ते सुरक्षेच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे करताना या सर्व बाबींची अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचनाही मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी कार्यकारी अभियंत्यांना दिल्या.