१९७१ च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धातील ‘हिरो’कडून ग्रॅच्युटी, पेन्शनचे १५ लाख दान

0

मेरठ: भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने या संकटाचा सामना करण्यासाठी देशाला आर्थिक मदतीची गरज आहे. यात अनेक जण पुढे येत आहेत. १९७१ च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात आपला एक डोळा गमावलेले व लष्करातून ज्युनियर कमीशन ऑफिसर पदावरून निवृत्त झालेल्या मोहिंदर सिंग यांनी ग्रॅच्युटी, पेन्शन आणि वेतनातून बचत केलेले १५.११ लाख रुपये कोरोनाशी दोन हात क रण्यासाठी पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये जमा केले आहेत.

मला जे काही मिळाले, ते याच देशातून मिळाले. आता देशाला गरज आहे. त्यामुळे देशाचा पैसा मी देशाला परत करत आहे. माझे वय आता ८५ वर्षे आहे. इतके पैसे घेऊन मी कुठे जाणार आहे?, अशा शब्दांत मोहिंदर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. मोहिंदर सिंह पत्नी सुमन चौधरी यांच्यासोबत राहतात. त्यांनी पत्नीसह पंजाब अँड सिंध बँकेच्या व्यवस्थापकांची भेट घेत मदतीचा धनादेश सुपूर्द केला.