१ जूनपासून ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेचा शुभारंभ !

0

नवी दिल्ली: केंद्र शासनाच्या ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ या महत्वाकांक्षी योजनेला १ जून पासून सुरुवात होणार आहे. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी याबाबतची माहिती दिली. या योजनेअंतर्गत ग्राहक एका रेशन कार्डाचा वापर देशभरात कोणत्याही ठिकाणी करू शकणार आहे.

यापूर्वी ‘एक देश एक रेशन कार्ड’ या योजनेचा पायलट प्रोजेक्ट चार राज्यांमध्ये लागू करण्यात आला होता. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि गुजरात या राज्यांमध्ये रेशन कार्डाच्या पोर्टेबिलिटीची सुविधा देण्यात आली होती. रामविलास पासवान यांनी या योजनेचं ऑनलाइन उद्घाटनदेखील केलं होतं. हा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्यास देशभरात ही योजना देशभरात लागू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली होती. या योजनेमुळे रेशन कार्ड धारक देशभरातील कोणत्याही रेशनच्या दुकानांमधून स्वस्त दरांमध्ये धान्य खरेदी करू शकणार आहे. या योजनेमुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल, अशी अपेक्षा सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे. तर कामानिमित्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या कामगारांनाही अनुदानित धान्यापासून वंचित राहावं लागणार नसल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.