100 लेवा आयकॉन्सचा मुंबईत भव्य सत्कार

0

लेवा समाज तसा छोटा समाज आहे, पण कर्तृत्ववान आहे – विधानसभा अध्यक्ष ना. हरिभाऊ बागडे
ग्लोबल लेवा पाटीदार फाऊंडेशनचे अध्यक्ष धनंजय कोल्हे लिखीत ‘लेवा आयकॉन्स’ या 790 पानी पुस्तकाचे प्रकाशन
जळगाव- लेवा पाटीदार समाजातील स्वकर्तृत्वाने आपापल्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या आणि मोठी कामगिरी करणार्‍या 100 जणांचा काल मुंबईत झालेल्या एका शानदार कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष ना. हरिभाऊ बागडे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी महसुल मंत्री आ. एकनाथराव खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात सत्कारार्थी 100 जणांवरील ग्लोबल लेवा पाटीदार फाऊंडेशनचे अध्यक्ष धनंजय कोल्हे लिखीत ‘लेवा आयकॉन्स’ या 790 पानी पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. यावेळी खा. रक्षाताई खडसे, आ. हरिभाऊ जावळे, आ. राजूमामा भोळे, माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांचेसह बारा देशातून आलेले मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना विधानसभेचे अध्यक्ष श्री. बागडे आपल्या भाषणात सांगीतले की, लेवा समाज तसा छोटा समाज आहे, पण कर्तृत्ववान आहे. बहिणाबाई चौधरी, भालचंद्र नेमाडे यांचेसारखे साहित्यिक दिले. मी ज्या विधानसभेच्या अध्यक्षपदावर आहे ते पद याच समाजातील मा. मधुकरराव चौधरी यांनी भुषविले आहे. त्यांनी मंत्री म्हणून शिक्षण विभागाला दिशा दिली. मा. एकनाथराव खडसे यांनी मंत्री, विरोधीपक्ष नेते व आमदार म्हणून जे कार्य केले त्यास तोड नाही. आपल्या अभ्यासपूर्ण शैलीने त्यांनी सभागृह गाजविले आहे. तिथे नावलौकिक मिळवून दिला आहे.
आपल्या अध्यक्षीय भाषणात आ. खडसे म्हणाले की, लेवा समाज हा कष्टाच्या व शिक्षणाच्या बळावर पुढे गेलेला समाज आहे. ज्यांचा आज इथे सत्कार झाला त्यांनी स्वकष्टाने आपले स्थान आपापल्या क्षेत्रात निर्माण केले आहे, त्यामुळे येणार्या पिढीला त्यांचा परिचय व्हावा, म्हणून त्यांचा सत्कार करणे यथोचित आहे. लेवा आयकॉन्समुळे ही समाजातील रत्ने समाजासमोर आली. शिक्षण, उद्योग, शेती, संगणक अशा विविध क्षेत्रात समाजबांधवांनी यशाचा मोठा पल्ला गाठला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. या कल्पक कार्यक्रमाचे जनक श्री. धनंजय कोल्हे यांनी या पुस्तकाद्वारे या आयकॉन्सला समाजासमोर आणण्याचे केलेले कार्य कौतुकास्पद आहे.
यावेळी माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, अतिशय आनंददायी समारंभ धनंजय कोल्हे यांनी आयोजित केला आहे. अतिशय परिश्रमातून ‘लेवा ऑयकॉन्स’ हे पुस्तक कयार केले आहे. सर्व आयकॉन्सनी एकत्र येवून शेती, शेतकरी व युवकांचे जीवन समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आपल्या प्रास्ताविकात धनंजय कोल्हे यांनी आपली भूमिका विषद करतांना सांगीतले की, समाजातील अनेक लोकांनी आपापल्या क्षेत्रात मोठमोठे यश संपादन केले आहे. त्यांचे कर्तृत्व समाजासमोर आणणे व त्याद्वारे युवकांना त्यांचा आदर्श निर्माण करणे हे माझे उद्दीष्ट होते. यासाठी मला मनोज चौधरी आणि शांताराम भोई साहेबांनी सहकार्य केले, म्हणूनच आजचा हा कार्यक्रम होऊ शकला.यावेळी देशोविदेशातील उद्योग, प्रशासन, व्यापार, शेती, संस्था अशा क्षेत्रात मोठा पल्ला गाठणार्या 100 आयकॉन्सचा स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. समाजातील अनेक मान्यवरांची उपस्थिती हे कार्यक्रमाचे वैशिष्ट होते.