13 वारसांना नोकरीसह धुलाई भत्यात वाढ

0

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे प्रभारी अध्यक्ष विजयजी सारवान यांचे भुसावळातील बैठकीत आदेश : शासन योजनांचा लाभ द्यावा

भुसावळ : वारसा हक्काने स्वच्छता कर्मचार्‍याची नेमणूक करताना पालिका सभागृहाच्या मंजुरी आवश्यकता नसल्याने तातडीने 13 वारसांना नोकरी द्यावी, धुलाई भत्ता 50 रुपयांवरून तीनशे रुपये करावा तसेच उच्चशिक्षीत स्वच्छता कर्मचार्‍यांना तातडीने पदोन्नतीचा लाभ देण्यात यावा, स्वच्छता कर्मचार्‍यांना गणवेश, बुटासह स्वच्छतेचे साहित्य पुरवावेत तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ द्यावा, असे आदेश राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे प्रभारी अध्यक्ष विजयजी सारवान यांनी येथे झालेल्या बैठकीत दिली. शुक्रवारी सायंकाळी त्यांनी पालिकेत स्वच्छता कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत मुख्याधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. प्रसंगी पालिकेकडून अनेक मुद्द्यांबाबत आयोगाची दिशाभूल केली जात असल्याने स्वच्छता कर्मचारी अत्यंत आक्रमक झाले.

13 वारसांना नोकरीचे आदेश
वारसा हक्काने नेमणुकीची पालिकेत तब्बल 13 प्रकरणे पडून असल्याने सारवान यांनी नाराजी व्यक्त करीत सभागृहाची त्यास मंजुरी घेण्याचे कारण नसल्याचे सांगत तातडीने वारसांना नोकरीत सामावून घेण्याचे आदेश दिले. कंत्राट तत्वावर काम करणार्‍या सफाई कर्मचार्‍यांना तीन-तीन महिने वेतन मिळत नसल्याचा मुद्दा समोर आल्यानंतर किमान वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्याचे सारवान यांनी निर्देश दिले. शासन आदेशाची अंमलबजावणी न करणे हा गुन्हाच असल्याचे ते म्हणाले. 2017 पासून स्वच्छता कर्मचार्‍यांना साहित्य न मिळाल्याची बाब गंभीर असून कर्मचार्‍यांना साहित्य पुरवण्याचे आदेश मुख्याधिकार्‍यांना देण्यात आले. यावेळी 50 रुपयांवरून धुलाई भत्ता 300 रुपये करावा, असे आदेशही त्यांनी दिले.

पदोन्नती न दिल्यास कारवाई करणार
उच्चशिक्षीत स्वच्छता कर्मचारी असतानाही पालिकेकडून त्यांना पदोन्नती न मिळाल्याने या संदर्भात कारवाई करणार असल्याचे सारवान म्हणाले. यावेळी विजया विजयसिंग ढिंक्क्याव यांनी पदोन्नतीबाबत लेखी अर्ज केल्यानंतर त्यावर कारवाईचे निर्देश देण्यात आले. स्वच्छता कर्मचार्‍यांचा घरांचा मुद्दा आल्यानंतर 1972 मध्ये 144 कर्मचार्‍यांना घरे देण्यात आली मात्र मालकी हक्क न देता त्यांची आजतागायत दुरूस्ती न झाल्याने सारवान यांनी नाराजी व्यक्त करीत या संदर्भात दखल घेण्याचे आदेश दिले शिवाय 302 सफाई कर्मचार्‍यांसाठी डॉ.बाबासाहेब श्रमसाफल्य योजनेतून घरांच्या निर्मितीबाबत काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या. नगरपालिकेच्या पाच टक्के निधी स्वच्छता कर्मचार्‍यांच्या वसाहतीत खर्च न झाल्याने पालिकेत शिल्लक असलेला 48 लाखांचा निधी खर्च करण्याचे आदेशही प्रसंगी देण्यात आले.

एस.एल.पाटील यांचा बैठकीत संताप
पेन्शनर्स असोसिएशनचे एस.एल.पाटील यांनी आयोगासमोर सेवानिवृत्तांच्या प्रश्‍नाबाबत निवेदन देत पालिकेच्या मुख्याधिकारी या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची दिशाभूल करीत असल्याने त्या आदेश पाळत नसल्याने न्यायालय मग हवेच कशाला? असा संताप व्यक्त केला. मुख्याधिकार्‍यांनी यावेळी आपले मत कुणाविषयी पूर्वग्रह दूषित नसल्याचे सांगत पेन्शनर्स असोसिएशनच्या मागण्यांबाबत पाठपुरावा केल्याची माहिती दिली.

20 वर्षांपासून ‘प्ले स्लीप’ नाही
स्वच्छता कर्मचार्‍यांसंदर्भात नगरपालिका वर्कर्स युनियनचे राजू खरारे, सुनील पवार, प्रमोद नकवाल आदींनी विविध समस्या मांडल्या. स्वच्छता कर्मचार्‍यांना 20 वर्षांपासून पगार स्लीप मिळालेली नाही, पालिकेतून कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर एका महिन्याच्या आत त्याला सर्व लाभ देण्याची मागणी करण्यात आली, पाच कर्मचार्‍यांना घरभाडे मिळाले नसल्याने त्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली तसेच कर्मचार्‍यांच्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान, आयोगाच्या अध्यक्षांनी स्वतःचा सत्कार न स्वीकारता स्वच्छता कर्मचारी लक्ष्मी चावरीया व नरेंद्र तुरकेले यांचा सत्कार केला.

स्वच्छता कर्मचारी नसताना संकुलाचे वाटप
प्रसंगी नगरपालिका गाळ्यांपैकी पाच टक्के स्वच्छता कर्मचार्‍यांनी पैकी कुणाला मिळाले ? याची विचारणा आयोगाने केल्यानंतर पालिकेने मोहन बारसे, किरण बारसे, गणेश बारसे यांना संकुल दिल्याची माहिती दिल्यानंतर माजी नगरसेवक संतोष बारसे यांनी आश्‍चर्य व्यक्त करीत स्व.मोहन बारसे आपले वडिल असून त्यांच्या नावाने गाळा दिला असल्यास तो कुणाला व कधी दिला? त्याची पावती दाखवून चौकशी करण्याची मागणी केली. बाबा तुलसीदास उदासी मार्केटमधील गाळा क्रमांक 31 हा मोहन बारसे यांना दिल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले मात्र संतोष बारसे यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करीत मूळात स्व.बारसे स्वच्छता कर्मचारी नसताना त्यांना गाळा दिलाच कसा व आपल्याकडे त्याबाबत कुठलीही पावती नसल्याने या गंभीर प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली.

यांची बैठकीला उपस्थिती
बैठकीला पालिका मुख्याधिकारी करुणा डहाळे, स्वीय सहाय्यक अ‍ॅड.फकिरचंद वाल्मीकी, माजी नगरसेवक संतोष बारसे, सचिन चावरे, अजय घेंगट, चेतन सनकत, आनंद गोयर, आतीष चांगरे, भारत सारवन, अमर ढिंक्याव, डॉ.विकास पाटील आदींसह स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.