जिल्ह्यात भरडधान्य खरेदीसाठी 15 केंद्र

0

खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू : 31 डिसेंबरपर्यंत मुदत


जळगाव: जिल्ह्यात खरीप पणन हंगाम 2019-20 मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत भरडधान्य (ज्वारी, बाजरी व मका) खरेदीकरीता जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी बिगर आदिवासी क्षेत्रात 15 खरेदी केंद्रांना मंजुरी दिलेली आहे. या खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांनी खरेदीसाठी ऑनलाईन नोंद करावयाची आहे.

शेतकर्‍यांनी चालु वर्षाचा ऑनलाईन 7/12 उतारा, आधार कार्डची झेरॉक्स व बँक पासबुक किंवा कॅन्सल चेकची झेरॉक्स सादर करावयाची आहे. शेतकरी नोंदणी 1 नोव्हेंबर, 2019 पासून सुरु झालेली असून नोंदणी व खरेदीची अंतिम मुदत 31 डिसेंबरपर्यंत आहे.

ज्वारीला 2550 तर बाजरीला 2 हजार रूपये भाव

सन 2019-20 च्या खरीप पणन हंगामात हायब्रीड ज्वारी रुपये 2550/- मालदांडी ज्वारी रु. 2570/-, बाजरी रु. 2000/- व मका रु. 1760/- असा हमीभाव शासनाने निश्चित केलेला असुन हमीभाव हा एफ.ए.क्यु. दर्जाच्या धान्याकरिता आहे. ज्यामध्ये न डागाळलेला, स्वच्छ प्रतिचा व 14 टक्क्यापर्यंत आद्रता असलेला माल खरेदी करण्यात येईल. तरी जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी भरडधान्य खरेदीकरीता ऑनलाईन नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी परिमल साळुंखे यांनी केले आहे.