लोकसभा निवडणुकीसाठी महापालिकेचे चार हजार कर्मचारी

0 1

पिंपरी-लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कर्मचारी लवकरच रुजू होणार आहेत. तब्बल चार हजार कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त राहणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या विभाग कार्यालयांसह विविध विभागांचे कामकाज दोन महिने थंड असणार आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीच्या कामासाठी महापालिका कर्मचा-यांना पाठविणे बंधनकारक आहे. लोकसभा निवडणुकीची तारीख नुकतीच जाहीर झाली आहे. शिरुर आणि मावळमध्ये 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. रविवार (दि.10)पासून आचारसंहिताही लागू झाल्यामुळे सर्वच विकासकामे थंडावली आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात ठिकठिकाणी झळकणारी राजकीय पक्षांची होर्डिंग्स काढण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर महापालिकेतील निवडणुकीचे कार्यालयही आता जोमाने कामाला लागले आहे. आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल. यासाठी महापालिका निवडणूक कार्यालयाला सजग राहून काम करावे लागणार आहे. त्यातच महापालिकेचे सुमारे चार हजार कर्मचारी लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी पाठविण्यात आले आहेत. आरोग्य, कीटक नाशक विभागासह सामान्य प्रशासन विभागातील शेकडो कर्मचा-यांचा यामध्ये समावेश आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग गेल्यामुळे महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असते. आदेश नाकारणा-या संबंधित अधिका-यावर गुन्हा नोंद होणे, अटक होणे अशी कारवाई होऊ शकते. चार हजार कर्मचारी निवडणूक कामासाठी पाठविण्यात आले असले तरी नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल, असे महापालिकेच्या अधिका-यांनी सांगितले.