मुंबई: महाराष्ट्र राज्यासह हरियाणा राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. २१ रोजी राज्यात मतदान होणार आहे, तर २४ रोजी निकाल लागणार आहे. महाराष्ट्र राज्यासह हरियाणा राज्यात भाजपाची सत्ता आहे. २०१४ मध्ये मोदी लाटेत या राज्यात सत्तांतर झाले होते. २०१४ मध्ये निवडणुकांदरम्यान करण्यात आलेल्या खर्चाचा अहवाल असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म या संस्थेने नुकताच प्रकाशित केला आहे. २०१४ मध्ये पार पडलेल्या निवडणुकांमध्ये भाजपाने विरोधीपक्षापेक्षा तब्बल पाच पट अधिक रक्कम खर्च केल्याचे समोर आले आहे.
२०१४ च्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी मिळून २८० कोटी रूपये प्रचारासाठी खर्च केले, असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. निवडणुकीदरम्यान राजकीय पक्षांना किती निधी मिळाला आणि त्यापैकी किती निधी खर्च केला याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुकीदरम्यान १५ पक्षांना एकूण ४६४.५५ कोटी रूपयांचा निधी मिळाला होता. त्यापैकी सर्व पक्षांनी मिळून ३५७. २१ कोटी रूपये खर्च केले होते.
त्या कालावधीत भाजपाला सर्वाधिक २९६.७४ कोटी रूपयांचा निधी मिळाला होता. त्यापैकी भाजपाने २१७.६८ कोटी रूपये खर्च केले होते. तर काँग्रेसला ८४.३७ कोटी रूपयांचा निधी मिळाला. त्यापैकी काँग्रेसने ५५.२७ कोची रूपये, शिवसेनेने १७.९४ कोटी रूपये, राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ कोटी रूपये खर्च केले असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, आता २१ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून २४ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे यावेळी कोणाला संधी मिळते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.