4 एफएसआयचा निर्णय जुन्या ‘बीआरटी’ ला नाही

0


महापालिका प्रशासनाने दिले स्पष्टीकरण

पुणे : एचसीएमटीआर रस्त्यावर राबवण्यात येणार्‍या बीआरटी प्रकल्पाच्या 500 मीटर परिसरात टीओडी धोरणांतर्गत 4 एफएसआय देण्याचा राज्य सरकारने जाहीर केलेला निर्णय जुन्या बीआरटीला लागू होणार नसल्याचे स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाने दिले आहे. शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी शहरातून उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर) केला जाणार आहे. या मार्गावर बीआरटी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या 500 मीटर परिसरात टीओडी अंतर्गत चार एफएसआय देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसे आदेशही जारी केले आहे. मात्र, या आधी राबवण्यात आलेल्या बीआरटी प्रकल्पाला हे धोरण लागू नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

धोरण लागू करता येणार नाही

काही दिवसांपूर्वी मेट्रो आणि एचसीएमटीआर मार्गासाठी टीओडी धोरणाची घोषणा राज्य सरकारने केली. यामुळे प्रकल्पांच्या 500 मीटर अंतरावर रस्त्याच्या रुंदीच्या प्रमाणात चार एफएसआय देण्यात येणार आहे. राज्य सरकारने हा धोरणात्मक निर्णय घेतल्या अन्य जुन्या बीआरटी प्रकल्पांना हा निर्णय लागू होईल का, याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते, त्यावर महापालिका प्रशासनाने वरील स्पष्टीकरण दिले आहे.याशिवाय महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार राज्यसरकारने केवळ एचसीएमटीआर प्रकल्पावर राबवण्यात येणार्‍या बीआरटी प्रकल्पासाठीच चार एफएसआय देण्याचा निर्णय घेतला आहे. शहरामध्ये स्वारगेट ते कात्रज आणि स्वारगेट ते हडपसर तसेच विश्रांतवाडी याठिकाणी सध्या बीआरटी प्रकल्प राबवण्यात येत आहे. या मार्गावरही चार एफएसआयचे धोरण लागू करता येणार नसल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.