Wednesday , December 19 2018
Breaking News

5235 कोटींचा अर्थसंकल्प सादर!

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर

पिंपरी-चिंचवड : आशियातील सर्वात ’श्रीमंत’ पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2018-19 या आर्थिक वर्षाचा मूळ 3500 कोटी तर जेएनएनयूआरएमसह 5235 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी गुरुवारी स्थायी समितीला सादर केला. 181 कोटी रुपये शिलकीच्या या अंदाजपत्रकात अनावश्यक कामे टाळून, सुरु आहे त्याच कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. शून्य व टोकण तरतूद असलेले सर्व लेखाशिर्ष वगळण्यात आले असून, जेवढ्या रकमेचे काम आहे, तेवढ्याच रकमेची निविदा काढायची, त्यासाठी तेवढीच रक्कम अर्थसंकल्पात ठेवण्यात आली आहे. चालू विकासकामांसाठी 100 टक्के तरतूद केली असून, त्याला निधीची कमतरता भासली जाणार नाही, असे नियोजन केले आहे. त्यामुळे तब्बल 265 पाने यंदा अर्थसंकल्पाच्या पुस्तिकेतून कमी झाले आहेत. मागासवर्गीय कल्याणकारी योजना, महिला व बालकल्याण योजना तसेच क्रीडा निधीत भरघोस वाढ करण्यात आली असून, मेट्रो प्रकल्पासाठी 50 कोटी आणि स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी 100 कोटी तसेच शहरी गरिबांसाठी तब्बल 928 कोटी 89 लाखांची तरतूद ही या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आहेत.

महिला, गरिबांसाठीही घसघशीत तरतूद
सभापती सीमा सावळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या विशेष सभेमध्ये महापालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे यांच्या उपस्थितीत आयुक्त श्रावण हर्डिकर, प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. महापालिकेचा हा 36 वा अर्थसंकल्प आहे. अंदाजपत्रकाची माहिती येईपर्यंत, जेवढ्या वर्कऑर्डर (कार्यरंभ आदेश) दिले आहेत. त्यांची माहिती घेऊन त्यासाठी लागणार्‍या पैशांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. देखभाल व दुरुस्तीसाठी विभागाने जेवढे पैसे मागितले आहेत. तेवढे पैसे दिले जाणार आहेत. त्याचबरोबर शून्य तरतूद अथवा टोकन हेडला यंदापासून मज्जाव करण्यात आला आहे. ज्या कामांसाठी सल्लागार नेमला आहे, त्याची सुरुवात झाली, केवळ अशा कामांसाठीच टोकन हेड ठेवले आहेत. यामुळे आहे त्याच कामांवर रक्कम खर्च केली जाणार आहे. तसेच या निर्णयांमुळे पालिकेला आर्थिक शिस्त लागेल. स्थापत्य विषय कामांसाठी 737.54 कोटी रुपयांची तरतूद केली असून, विशेष योजना अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना या लेखाशीर्षावर 565.63 कोटी रुपयांची तरतुद प्रस्तावित केली आहे. शहरी गरिबांसाठी अंदाजपत्रकात 928.89 कोटींची तरतूद केली आहे. महिलांच्या विविध योजनांसाठी 33 कोटींची तरतूद असून, महापौर विकास निधीसाठी 5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय, अपंग कल्याणकारी योजनेसाठी 20 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

नागरिकांच्या सूचनांची अर्थसंकल्पात दखल
स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद ठेवण्यात आली आहे. तर पीएमपीएमएलसाठी 164.56 कोटी रुपयांची तरतूद आयुक्तांनी केली आहे. भूसंपादनाकरिता 140 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 92.45 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, मेट्रो प्रकल्पासाठी महापालिकेच्या हिस्स्यापोटी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. स्वच्छ भारत मिशनसाठी 28 कोटी, अतिक्रमण निर्मुलन व्यवस्थेसाठी 2.55 कोटी, पाणीपुरवठासाठी विशेषनिधी 23 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. स्मार्ट सिटी योजनेसाठी पिंपरी-चिंचवडकरांनी व्यक्त केलेल्या मनोगतात वाहतुकीची समस्याच सर्वात उग्र असल्याचे स्पष्ट केल्याने त्याची दखल घेत महापालिका आयुक्तांनी अर्थसंकल्पात वाहतुकीवर सर्वाधिक भर दिला आहे. रहाटणीतील कोकणे चौक ते काळेवाडी फाटा अंतर्गत वर्तुळाकार रस्ता म्हणजे एचसीएमटीआर प्रकल्पासाठी 16 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

’स्मार्ट सिटी’साठी 100 कोटी
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या तिसर्‍या टप्प्यात शहराची निवड झाली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत एरिया बेस डेव्हलपमेंट आणि पॅन सिटी सोल्यूशन हे दोन घटक आहेत. त्यासाठी महापालिकेने 100 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. अर्थसंकल्पात क्रीडा निधीतही भरीव वाढ (32 कोटी 60 लाख) करण्यात आली आहे. त्यातून शहरातील वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आहे. अर्थसंकल्पात तरतूद केलेली रक्कम शंभर टक्के खर्च करण्यावर प्रशासनाचा भर असेल, असे आयुक्तांनी सांगितले.

ठळक वैशिष्ट्ये
1. भक्ती-शक्ती चौक येथे ग्रेड सेपरेटर व उड्डाणपुल बांधण्यासाठी 33 कोटी इतकी तरतूद. हे काम डिसेंबर 2019 अखेर पूर्ण करणार
2. भक्ती-शक्ती चौक ते मुकाई चौक, किवळे या संपूर्ण रस्त्यासाठी 12 कोटी रुपयांची तरतूद
3. पिंपरी, मासुळकर कॉलनी येथील आ.क्र. 85 येथे नागरी आरोग्य केंद्र, नेत्र रुग्णालय व निवासी डॉक्टरांचे वसतीगृह बांधण्यासाठी 8.68 कोटी रुपयांची तरतूद
4. प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यासाठी 15 कोटी रुपये देणार
5. बोपखेल-आळंदी या 60 मीटर रुंद रस्त्यासाठीच्या चार पॅकेजसाठी 10.60 कोटी इतकी रक्कम राखीव
6. चिंचवडगाव, रुपीनगर तसेच मोशी येथे 12 कोटी खर्चाचे अद्ययावत स्मशानभूमी बांधणार
7. नाशिक फाटा ते वाकड बीआरटीएस रस्त्यावर साई चौक (जगताप डेअरी) रहाटणी येथे दोन समांतर समतल वितलग बांधण्यासाठी 20 कोटींची तरतूद
8. दापोडी येथील हॅरीस पुलाला समांतर दोन पुलासाठी 10.50 कोटींची तरतूद
9. पिंपरी येथे निःसमर्थ अंध अपंगासाठी सांस्कृतिक केंद्र बांधण्यासाठी 5 कोटी राखीव
10. गोविंद यशदा चौक पिंपळेसौदागर येथे अंडरपाससाठी 6.5 कोटी
11. आचार्य अत्रे रंगमंदीराचे नूतनीकरण करण्यासाठी तीन कोटी
12. राज्य शासनाने मंजूर केलेल्या अमृत योजनेअंतर्गत 210 किलोमीटर लांबीच्या मलनिःसारण नलिकांची क्षमता वाढविणार

स्मार्ट सिटीसाठीच्या रकमेत घसघशीत वाढ
हा अर्थसंकल्प उत्तम असल्याची प्रतिक्रिया स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी दिली. आयुक्त हर्डिकर यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचा दृष्टीने काटेकोर अर्थसंकल्प तयार केला आहे. त्यात मागील सत्ताधार्‍यांप्रमाणे ’गाजराची शेती’ नसल्याचा टोमणाही सावळे यांनी मारला. आयुक्त हर्डिकर म्हणाले, अर्थसंकल्पात स्मार्ट सिटी आणि मेट्रो या दोन मोठ्या प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पात 49 कोटी 50 लाखांची तरतूद होती. ती यंदा दुप्पट करून 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 92 कोटी 45 लाख, स्वच्छ भारत अभियान योजनेसाठी 28 कोटी, अमृत योजनेसाठी 59 कोटी 63 लाख, महिलांच्या विविध योजनांसाठी 33 कोटी आणि शहरी गरीबांसाठी 928 कोटी 89 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

About admin

हे देखील वाचा

मी पाकिस्तानी गायक असतो तर बरं झालं असतं – सोनू निगम

मुंबई : प्रेक्षकांना आपल्या आवाजानं मोहित करणार गायक सोनू निगमवर आता स्वत:ला पाकिस्तानी गायक म्हणवून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!