8 मार्चला आचारसंहिता लागण्याची शक्यता

0 1

अजित पवार यांचे मत : बारामतीत राष्ट्रवादीचा मेळावा

बारामती : अहमदबाद येथे 8 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन होणार असून त्यांच्या कार्यकाळातील हा अखेरचा कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे 8 तारखेला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता असल्याचे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मेळाव्यानंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे एका सभेत म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या हाती पुन्हा देशाची सत्ता देण्यासाठी मला निवडून द्या. पण जनतेला नरेंद्र मोदी नको आहेत. त्यामुळे तुम्ही निवडून येण्याचा प्रश्न येतोच कुठे, अशा शब्दांत त्यांनी रावसाहेब दानवेंना टोला लगावला.

श्रेयवाद संपला पाहिजे

पुलवामा येथे जवान शहीद झाल्यानंतर आपल्या हवाई दलाने जशास तसे उत्तर देऊन दहशतवाद्यांना संपवले. त्या घटनेला काही तास होत नाही. तोवर त्यावरून भाजपाकडून राजकारण केले गेले. या कारवाईचे सर्व श्रेय भाजप घेताना दिसत आहे. यावेळी हवाई दलाचे अभिनंदन करण्याचे काम सत्ताधारी पक्षाने केले पाहिजे, मात्र हे होताना दिसले नाही. हा श्रेयवाद संपला पाहिजे, असे पवार यांनी सांगितले.

जागा वाटप 8 तारखेपर्यंत निश्चित होईल!

देशातील नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने पावले उचलण्याची गरज असताना पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. या प्रकाराला काय म्हणायचे? असा सवाल उपस्थित करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अजित पवार यांनी निशाणा साधला. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत ते म्हणाले, लोकसभेसाठीच्या जागांचे वाटप 8 तारखेपर्यंत निश्चित होईल. काँग्रेसकडे नगरची जागा असेल अशी चर्चा ऐकण्यास मिळत आहे. याबाबत पक्षातील वरीष्ठ मंडळींशी चर्चा केली असून राष्ट्रवादीकडे नगरची जागा असणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाला पराभूत करण्यासाठी समविचारी पक्षांसोबत चर्चा देखील चालू असल्याचे ते म्हणाले.