30 वर्षानंतर मुक्ताईनगरातील खडसेंच्या नाथपर्वाला धक्का

0

चेतन साखरे

जळगाव – जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदारसंघात सन 1990 ते 2019 पर्यंत या 29 वर्षाच्या कालखंडानंतर आज खडसेंच्या ‘नाथपर्वाला’ शिवसेनेच्या बंडखोराने धक्का दिला आहे. खडसेंचे राजकीय अस्तित्वच या माध्यमातुन संपविण्याचा डाव यशस्वी झाल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. विधानसभेच्या या पराभवाने माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुंठावाचून खोकला मिटविण्याचा प्रकार या मतदारसंघात दिसून आला.

जिल्हाच नव्हे तर खान्देशात भाजपाचे संघटन मजबुत करण्यामध्ये माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा सिंहाचा वाटा राहीला आहे. जळगाव जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. अशा प्रतिकुल परिस्थीतीत एकनाथराव खडसे यांनी स्व. बाळासाहेब चौधरी, स्व. जे.टी.महाजन, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यासारख्या नेतृत्वांशी दोन हात करीत त्यांनी केळी पट्ट्यात आपले वर्चस्व सिध्द केले. भाजपाचे नेते एकनाथराव खडसे यांची राजकीय कारकिर्द मोठी संघर्षमयी राहीली आहे. अंगावर आलेल्या प्रत्येकाला त्यांनी शिंगावर घेत चीत केले होते. भटजी आणि शेठजींच्या या पक्षाला उत्तर महाराष्ट्रातुन खडसेंच्या रूपाने ओबीसी चेहरा मिळाला होता. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात ही ओळख पुसली गेली. सन 1990 पासून ते 2019 पर्यंत सलग सहा वेळा माजी मंत्री एकनाथराव खडसे हे मुक्ताईनगर मतदारसंघातुन निवडून आले. स्वत:सह त्यांनी पक्षाची पाळेमुळे देखिल खोलवर रूजविली. सन 1999 मध्ये पाटबंधारे मंत्री असतांना त्यांनी जिल्ह्यात सिंचनाचे मोठी कामे केली. तसेच जिल्ह्यासाठी मोठा निधी देखिल त्यांनी खेचून आणला होता. त्यानंतर आघाडी सरकार आले. 15 वर्षाच्या आघाडी सरकारच्या काळात एकनाथराव खडसे यांनी विधीमंडळ गटनेते, विरोधी पक्षनेता अशी विविध पदे भूषविली. या पदांच्या माध्यमातुन आघाडी सरकारवर त्यांनी जोरदार प्रहार केले. विधानसभेत सरकारला सळो की पळो करून सोडणार्‍यांमध्ये खडसे एकमेव होते. मात्र सन 2014 मध्ये सत्ता आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाची आशा बाळगली आणि तेथुनच त्यांच्या राजकीय कारकीर्दीला उतरती कळा लागली असेच म्हणावे लागेल. मुख्यमंत्री पदाची माळ फडणवीसांच्या गळ्यात पडल्यानंतर दुसर्‍या नंबरचे मंत्री म्हणून खडसेंकडे 12 खात्यांचा कारभार देण्यात आला. याकाळात त्यांनी शेतकर्‍यांसाठी महत्वाकांक्षी निर्णय घेतले. मात्र अवघ्या दिड वर्षात त्यांच्यावर दाऊद संभाषण, भोसरी जमीन खरेदी व्यवहार, जावयाची लिमोझीन कार यासारख्या कथित आरोपांवरून त्यांना मंत्रीपद सोडावे लागले. या सर्व प्रकरणांची झोटींग समितीमार्फत आणि लाचलुचपत विभागामार्फत चौकशी झाली. त्यात खडसेंना क्लिन चीट देखिल देण्यात आली. मात्र तरी देखिल खडसेंना मंत्रीपद मिळु शकले नाही किंवा मिळू दिले नाही. सत्ताधारी राहुनही खडसेंनी नेहमीच विधानसभेत सरकारला अडचणीत आणल्याचा समज वरीष्ठांचा झाला. त्यामुळे खडसेंना विधानसभेत उमेदवारी मिळेल की नाही? याची शाश्वती देखिल मिळत नव्हती. खुद्द खडसे यांनी यासंदर्भात जाहीर भूमिका घेतली होती. आणि तसेच झाले एकनाथराव खडसेंचा पत्ता कट करून त्यांच्या कन्या अ‍ॅड. रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. याठिकाणी शिवसेनेचे बंडखोर चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवारी केली. तर राष्ट्रवादीकडुन अ‍ॅड. रवींद्र पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र ऐन माघारीच्या दिवशी राष्ट्रवादीने खेळी करीत खडसेंना घेरण्यासाठी चंद्रकांत पाटील यांना पुरस्कृत करून रवींद्र पाटलांची माघार करून घेतली. आता खडसेंची अभिमन्यु सारखीच अवस्था झाली. खडसे हे चक्रव्युह भेदतील असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र हा अंदाज आज मतमोजणीअंती खोटा ठरला. शिवसेनेचे बंडखोर आणि राष्ट्रवादीचे पुरस्कृत चंद्रकांत पाटील यांचा अवघ्या 1987 मतांनी विजय होऊन भाजपाच्या अ‍ॅड. रोहिणी खडसे पराभूत झाल्या. एकुणच या निकालाने नाथपर्वाला धक्काच देऊन त्यांचे राजकीय अस्तित्वच संपुष्टात आणल्याचे चित्र दिसून येत आहे.