अमिताभ बच्चन यांनी मागितली माफी

0

मुंबई: सोनी टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘कौन बनेगा करोडपती’चा 11 व्या सीजनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करण्यात आला होता. यानंतर सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात सोनी टीव्ही, अमिताभ बच्चन यांच्यावर टीकेचे सूर उमटले होते. केबीसी आणि सोनी टीव्हीवर नेटिझन्सकडून पूर्णपणे बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती. अखेर जात असताना अखेर सोनी टीव्हीने आपली चूक मान्य करत माफी मागून या वादावर पडदा टाकला. तसेच केबिसीचे अॅंकर बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील या प्रकरणी माफी मागितली आहे.

केबीसी शोमध्ये बुधवारी प्रसारित झालेल्या भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ देताना अनावधानाने त्यांच्या नावाचा उल्लेख एकेरी शब्दात झाला. अनावधानानं प्रेक्षकांच्या भावना दुखवल्याबद्दल आम्ही प्रेक्षकांची माफी मागतो असं वाहिनीनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. सोनी टीव्हीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करण्यात आला होता.

केबीसी या शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्यानं सोशल मीडियावर संतापाची लाट उठली आहे. केबीसीमध्ये एका प्रश्नासाठी 4 ऑप्शन दिले जातात, यावेळी शिवरायांच्या नावासमोर छत्रपती किंवा महाराज असा उल्लेखही करण्यात आलेला नव्हता, शिवाय अमिताभ बच्चन यांनीही तसा आदरार्थी उल्लेख केला नव्हता. त्यामुळे सोशल मीडियावर अमिताभ बच्चनविरोधात टीकेची झोड उठली आहे. अमिताभ बच्चन यांनी या प्रकरणी माफी मागितली आहे. अनादर करण्याचा आजिबात हेतू नव्हता, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो असं त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.