औरंगाबाद :- औरंगाबादमध्ये शुक्रवारी रात्री उसळलेल्या हिंसाचाराची उच्चस्तरीय सखोल चौकशी केली जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री (शहर) रणजीत पाटील यांनी दिली. हिंसाचारामध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असल्याची माहिती त्यांनी दिली. आतापर्यंत ३५ संशयितांना ताब्यात घेतले आहे,’ अशी माहिती पाटील यांनी दिली.
ADVERTISEMENT
रणजीत पाटील सांगितले की, शहरातील एकाच वेळी चार–पाच ठिकाणी जाळपोळ व दगडफेकीच्या घटना घडल्यामुळे पोलिसांना सर्वच ठिकाणी वेळेत पोहचता आले नाही. घडलेल्या घटना अतिशय दुर्दैवी असून सोशल मिडियाच्या गैरवापरामुळे दंगल भडकण्यास हातभार लागला. सायबर सेलला याविषयी तपास करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार दंगलीची सखोल चौकशीसाठी राज्यस्तरावरील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली जाणार आहे. या चौकशीतुन सर्व सत्य बाहेर येईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
हिंसाचारात दोन कोटींपेक्षा जास्त मालमत्तेचे नुकसान
औरंगाबादमधील शुक्रवारी रात्री मोतीकारंजा भागात रात्रभर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात जमावबंदी लागू केली आहे. हिंसाचाराचे लोण अन्यत्र पसरु नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून औरंगाबाद शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.या हिंसाचारात दोन कोटींपेक्षा जास्त मालमत्तेचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तलवार, चाकू, लाठयाकाठयांसह सज्ज होऊन आलेल्या जमावाने तुफान दगडफेक केली. अनेक पोलिसही या दगडफेकी जखमी झाले आहेत. २५ ते ३० जण या हिंसाचारात जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला होता. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती आहे.