चौकशीचा ससेमिरा टाळण्याची घ्या खबरदारी, प्रशासनाचे बँक खात्यांवर बारीक लक्ष
जळगाव । केंद्रीय निवडणूक आयोगाने 17 व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली असून, रविवारी सायंकाळपासून सर्वत्र आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक काळात बँकांमधून होणार्या आर्थिक व्यवहारांवर प्रशासनाचे बारीक लक्ष राहणार असून, 20 हजार रूपयांपेक्षा अधिक रक्कम काढल्यास चौकशी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज पत्रपरिषदेत दिली आहे.
जिल्ह्यात लोकसभा निवडणुका निर्भय वातावरणात व पारदर्शकपणे पार पडण्यासाठी सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी हॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे. निवडणूक काळात आर्थिक व्यवहाराच्या मोठ्या तक्रारी आचारसंहिता कक्षाकडे येत असतात. त्या दृष्टीने जिल्ह्यातील बँकांच्या अधिकार्यांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना देणार आहे. 20 हजार रूपयांहून अधिक रक्कम काढायची असल्यास योग्य कारण द्यावे लागणार आहे. तसेच सोशल मीडियावरील प्रचारासंदर्भात काही तक्रारी असल्यास या विषयातील तज्ञांचीही नियुक्ती करण्यात आली असल्याचे डॉ. ढाकणे यांनी सांगितले.