प्रदर्शनाच्या तोंडावर ‘भारत’ चित्रपट अडचणीत; नाव बदलण्याची नामुष्की ?

0

नवी दिल्ली: बॉलीवूडचा दबंग सलमान खानचा ‘भारत’ हा सिनेमा येत्या ५ जूनला प्रदर्शित होत आहे. पण प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याचे चिन्ह आहेत. चित्रपटाच्या ‘भारत’ नावावरून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. ‘भारत’ हे चित्रपटाचे शीर्षक लोकांच्या भावना दुखावणारे असल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे.

याचिकाकर्त्याने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करून सलमानच्या या चित्रपटाचे शीर्षक बदलण्याची मागणी केली आहे. सलमानच्या चित्रपटाचे नाव हे बोधचिन्हे व नावे (अनुचित वापर प्रतिबंधक) कायद्याचे उल्लंघन आहे. या कायद्यानुसार, ‘भारत’ शब्दाचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करता येत नाही, असा दावा याचिकाकर्त्याने केला आहे. या चित्रपटातील एक डायलॉग गाळण्याची मागणीही याचिकाकर्त्याने केली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हा डायलॉग ऐकायला मिळाला होता. यात सलमान आपल्या नावाची तुलना देशाशी करताना दिसतो. हा संवाद भारतीयांच्या भावना दुखावणारा असल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे.

यापूर्वी सलमानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाच्या शीर्षकावरूनही वाद झाला होता. या वादावर हिंदू संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता. याशिवाय सलमान निर्मित ‘लवरात्री’ या चित्रपटालाही असाच विरोध झाला होता. अखेर ऐनवेळी या चित्रपटाचे नाव बदलून ‘लवयात्री’ ठेवण्यात आले होते. तूर्तास सलमान व कतरीना कैफ ‘भारत’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. अली अब्बास जफर दिग्दर्शित हा चित्रपट ‘ओड टू माय फादर’ या कोरियन चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात सलमान पाच वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. भारत या चित्रपटात सलमान खान आणि कतरीना कैफसोबत जॅकी श्रॉफ, नोरा फतेही, सुनील ग्रोव्हर, तब्बू, दिशा पाटनी असे अनेक कलाकार आहेत. ईदच्या मुहूर्तावर ‘भारत’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा सिनेमा हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे.