गणोरला बिबट्याचा हल्ला; तीन जखमी

0

एकाची प्रकृती चिंताजनक, शेतकर्‍यांच्या दगडफेकीत बिबट्या जखमी

शहादा – तालुक्यातील गणोर येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 3 नागरिक जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

हल्लेखोर बिबट्याला पळवून लावण्यासाठी नागरिकांनी केलेल्या दगडफेकीत बिबट्या जखमी झाला आहे. जखमी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी संपूर्ण परिसरात वनविभागामार्फत छावणी लावण्यात आल्याची माहिती वन विभागाने दिली. दरम्यान, पाडळदा गावातही बिबट्याने बकरी फस्त केली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे.

बुधवारी, सकाळी दहा ते साडे दहा वाजेच्या सुमारास बन्सीलाल सजन भामरे (रा. गणोर, तालुका शहादा) या शेतकर्‍याच्या शेताजवळ दिलवरसिंग निकुम, कैलास ठाकरे, अनिल रावताळे हे बकर्‍या चारत होते. यावेळी बिबट्या अचानक शेतातून बाहेर आला आणि त्याने दिलवरसिंग यांच्यावर हल्ला केला. इतर दोघांनी बिबट्याला हुसकावून लावण्यासाठी हातातील काठीच्या सहाय्याने त्याच्यावर प्रहार केले आणि आरडाओरड सुरू केली. तो ऐकून परिसरातील इतर शेतकरी, शेतमजूर व नागरिकांनी बिबट्यावर दगडफेक केली. यात जखमी झालेला बिबट्या पळून गेला. घटनास्थळी सहाय्यक उपवनसंरक्षक एस. आर. चौधरी, शहादा वनक्षेत्रपाल अनिल पवार, राणीपूर वनक्षेत्रपाल एस. के. खुणे, तोरणमाळ वनक्षेत्रपाल मंगेश चव्हाण, संजय पवार, केशव पावरा, कांतीलाल वळवी, भिका पावरा, दिलीप खेडकर, आदींसह वनविभाग व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने परिसरात बंदोबस्तासाठी होते.