‘संकटमोचका’च्या उत्तर महाराष्ट्रात भाजपाच संकटात!

0

डॉ. युवराज परदेशी

गेल्या महिनाभरापासून सुरु असलेली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी गुरुवारी खर्‍या अर्थाने संपली. भाजपाला लोकसभेत मिळालेले एकतर्फी यश, पाकिस्तानवर केलेला सर्जिकल स्ट्राईक, कलम 370, ट्रिपल तलाक यासारखे अस्त्र-शस्त्र घेवून रणांगणात उतरलेल्या भाजपामुळे ही निवडणूक एकतर्फी होणार असे काहीसे चित्र असतांना अंतिम निकालानंतर महाराष्ट्र भाजपाचे पाय जमीनीवर आले असतीलच. संपुर्ण राज्यात भाजपाला अपेक्षित यश मिळालेले नाही, यात उत्तर महाराष्ट्राचाही समावेश आहे. विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी भाजपाचे विशेषत: मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे जलसंपदा मंत्री गिरिश महाजनांवर सोपविण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील 47 मतदारसंघांपैकी 45 प्लस जागांवर यश मिळवण्याची भीष्मप्रतिज्ञा त्यांनी केली होती मात्र त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले. घरच्या मैदानावर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर, विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे, आ.शिरिष चौधरी यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांना पराभवाचा फटका बसला.

गेल्या दोन वर्षांपासून जळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मिळवणार्‍या गिरिष महाजन यांनी जळगाव जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगरपालिका, पंचायत समित्या अशा सर्वच निवडणुकांमध्ये भाजपाला एकहाती सत्ता मिळवून दिली. त्यांच्यावर सोपविलेली नाशिक व धुळे महापालिकेची जबाबदारीही त्यांनी लिलया पेलली. यामुळे यंदा त्यांच्यावर उत्तर महाराष्ट्रातील 47 जागांची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या मातब्बरांच्या सभा झाल्यानंतर देखील भाजपाला अपेक्षित यश मिळवता आले नाही. अंतिम निकालानंतर भाजपाला 13, शिवसेना 5, राष्ट्रवादी 9, काँग्रेस 4, एमआयएम 2 व इतर दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले. खान्देशत भाजपाचे जळगाव शहरचे आमदार सुरेश भोळे, चाळीसगावचे मंगेश चव्हाण, भुसावळचे आमदार संजय सावकारे, जामनेर मधून स्वत: गिरिश महाजन, धुळे जिल्ह्यातून शिंदखेडाचे भाजपचे मंत्री जयकुमार रावल, शिरपूर-भाजप आमदार काशिराम पावरा, साक्री-भाजपच्या बंडखोर अपक्ष माजी महापौर मंजुळा गावीत तर नंदुरबार जिल्ह्यातून नंदूरबारचे भाजपचे माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावीत आणि शहादा मतदार संघातून राजेश पाडवी विजयी झाले आहेत. या निवडणुकीतील लक्षणिय बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीतील यशानंतर एमआयएम विधानसभा निवडणुकीत औरंगाबादपुरती मर्यादित राहील, अशी अटकळ होती. मात्र सर्वांचे अंदाज फोल ठरवत एमआयएमने धुळे शहर आणि मालेगाव मध्यची जागा जिंकत उत्तर महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. धुळे शहर मतदारसंघातून आमदार अनिल गोटे आणि राष्ट्रवादीचे राजवर्धन कदमबांडे यांच्या लढतीत माजी उपमहापौर डॉ. फारुक शाह यांनी बाजी मारली. तसेच मालेगावमधून काँग्रेसचे आमदार आसिफ शेख यांचा पराभवाच करत राष्ट्रवादी सोडून एमआयएमचे उमेदवारी करणारे मौलाना मुफ्ती ईस्माईल हे विजयी झाले आहेत. एकनाथराव खडसेंना पक्षाने दुर लोटल्यामुळे खान्देशात भाजपाला निश्चितपणे फटका बसला आहे. याची कारणमिमांसा होईलच मात्र कुरघोडीच्या राजकारणामुळे खान्देशात भाजपाच्या बालेकिल्ल्यांचा बुरुज ढासळण्यास सुरुवात झाली आहे हे मात्र नाकारुन चालणार नाही.