रावेरात भाजपाला बंडखोरीचा फटका

0

शालिक महाजन

रावेर :रावेर विधानसभेतुन विद्यमान भाजपाचे आमदार हरीभाऊ जावळे यांचा 15,609 इतक्या मतांनी पराभव करत शिरीषदादा चौधरी हे विजयी झाले आहे. भाजपाच्या अनिल चौधरी यांनी बंडखोरी केल्यामुळे काँग्रेसच्या शिरीष चौधरी यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. अतिशय अटीतटीची वाटणार्‍या निवडणूकीत सुरुवातीपासूनच कॉग्रेस शिरीषदादा चौधरी यांनी आघाडी घेतली. ती आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते अपक्ष उमेदवार अनिल चौधरी हे काँग्रेस पक्षाची मते घेतील असा अंदाज होता. मात्र त्यांनी भाजपाची मते खेचली. तर वंचित बहुजन,बहुजन समाज पार्टी,एमआयएमला मतदारांनी प्रतिसाद अपेक्षित न दिल्याने काँग्रेसचा विजय झाला.

या कारणांमुळे जावळेंचा झाला पराभव

1974 पासुन प्रत्येक टर्मला नवीन आमदार निवडण्याची परंपरा जनतेने अबाधित ठेवली. मागील पाच वर्षात सर्वसाधारण जनतेशी हरीभाऊ जावळे यांचा संपर्क कमी होता. पदाधिकारी व कार्यकर्ते मार्फत पक्ष संघटन व भाजपाची कामे जनतेपर्यंत पोहचविण्यात अपयश आले. विजयाला लागणारी भाजपाची मते ऐनवेळी अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्याकडे गेल्याने जावळे यांना त्याचा मोठा फटका बसला. मराठा समाजाची मते भाजपाकडे वळविण्यास अपयश आले म्हणून बराच मराठा समाज कॉग्रेसकडे गेला. दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात अपयश आल्याने जनतेत रोष होता.

संपर्कात सातत्याने शिरीष चौधरींच्या गळ्यात विजयी माळ

पक्ष संघटन व मतदारसंघातील सर्व समाजाती व्यक्तीला सोबत घेऊन मतदारापर्यंत आपले व्हिजन पोहचवीले. विद्यमान आमदारांचा दुर्लक्षाचा फायदा घेत पदाधीकारी सोडून थेट जनतेशी संपर्क ठेवला. 2014 च्या वेळी नडलेले सर्वांना बाजूला ठेवून नवीन फळी तयार केली व त्याचा पूरेपुर फायदा शिरीषदादा चौधरी यांनी करून घेतला. 2014 च्या पराभवाला कारणीभुत ठरलेले ज्ञानेश्वर बढे (मामा) 2019 मध्ये मतदारसंघात फिरकले नाही.याचा देखिल मोठा फायदा शिरीषदादा चौधरींना झाला.

मतांची विभागणी हरीभाऊ जावळेंसाठी ठरली डोकेदुखी

अतीशय अटीतटीची वाटणार्‍या या निवडणूकीत मतांच्या विभागणीमुळे शिरीष चौधरींचा विजय सोपा केला आहे. शिरीष चौधरी(कॉग्रेस)यांना 77,941 इतकी मते मिळाली तर हरीभाऊ जावळे(भाजपा)यांना 62,332 इतकी मते मिळाली तर अपक्ष अनिल चौधरी यांना 44,841 मिळालेल्या मतांमुळे येथून कॉग्रेसचा 15,609 इतक्या मतांनी विजय मिळविता आला आहे.